ShriRam Janmabhumi History : श्रीरामजन्मभूमीवर इंग्रजांनी १९०२ मध्ये बसवले निशाण्यांचे दगड ! – संशोधक आशुतोष बापट

५०० वर्षांनंतर श्रीराममंदिर उभारले हा ऐतिहासिक क्षण !

रत्नागिरी – अयोध्येत वादग्रस्त इमारतीच्या पूर्व दरवाजाजवळ १९०२ मध्ये समारंभपूर्वक इंग्रजांनी महसुली निशाण्यांचे दगड बसवले. यामध्ये क्रमांक १ रामजन्मभूमी आणि क्रमांक ५ रामजन्मस्थान यांची नोंद केली गेली. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर होते, याची माहिती असल्यामुळे ब्रिटिशांनी ही नोंद केली.

स्वातंत्र्यानंतर रामलला प्रकटले, नंतर कुलुप बंद होते; परंतु उत्खनन, संशोधनातून आणि पुढे न्यायालयातील दावे, कारसेवा, रामजन्मभूमी असे होत होत ५०० वर्षांनंतर श्रीराममंदिर दिमाखात उभे राहिले, असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक श्री. आशुतोष बापट यांनी केले.

श्री. आशुतोष बापट

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृती व्याख्यानमालेच्या शेवटच्या व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. आशुतोष बापट म्हणाले की,

१. वर्ष १५२८ मध्ये बाबर अयोध्येत आला. वर्ष १७२२ ला सादत खान सुभेदार झाला. त्याने मोगल सत्ता झुगारून स्वतःची सत्ता स्थापन केली. वर्ष १८५८ पर्यंत नबाबांची अयोध्येवर सत्ता होती. वर्ष १८५६ वाजीद अलीला हटवून अयोध्येची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीने घेतली. डब्ल्यू. एच्. स्लीमन हा तिचा अधिकारी त्या वेळी होता. वर्ष १८५८ मध्ये निहंग फकीर खालसाने राममूर्ती बसवल्या. एक महिना त्याच्या कह्यात सर्व परिसर होता. महंत रघुबीर दास यांनी मंदिर निर्मितीसाठी प्रयत्न केले.

२. वर्ष १९४७ ते ४९ दरम्यान सोमनाथ मंदिर उभे राहिले आणि २२ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री रामलला प्रकट झाले. मूर्तीची पूजा अर्चा सरकारी खर्चाने चालू झाली; परंतु त्यानंतर रामलला कुलुपात बंद केले. वर्ष १९८६ मध्ये कुलुप उघडले गेले आणि वर्ष १९८९ मध्ये मंदिराचा शिलान्यास झाला. वर्ष १९७५ ते ७७ पहिले उत्खनन केले गेले. त्यात के.के. महंमद यांचा समावेश होता.

३. वर्ष २००२ मधये टोजो विकास इंटरनॅशनलने जी.पी.आर्. सर्वेक्षण केले. वर्ष २००३ मध्ये बी.आर्. मणी यांच्या नेतृत्वात उत्खनन करण्यात आले. त्यांनी १३०० पासून ते १६ वे शतक मोगल काळ असे ९ भागांत वर्गीकरण केले.

४. यामध्ये अनेक मूर्ती, नाणी, वस्तू, मकरप्रणाल, आमलक सापडले. २२ बाय १४ मीटरचा चौथरा आढळला. विष्णुहरि शिलालेख हा महत्त्वाचा पुरावा सापडला. श्रीराममंदिरासाठी वर्ष १९५० पासून अनेक दावे न्यायालयात प्रविष्ट (दाखल) झाले.

५. हिंदु महासभा, निर्मोही आखाडा यांनीही दावे प्रविष्ट केले. वर्ष १९८९ मध्ये भगवान श्रीरामलला विराजमान श्री रामजन्मभूमी आणि जवळचा मित्र सखा या भूमिकेतून देवकीनंदन अगरवाल यांनी दावा प्रविष्ट केला. यातून रामलला देवतेचे न्यायिक अस्तित्व  अधिकार प्रस्थापित झाला.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, महाविद्यालय गेल्या वर्षापासून स्वायत्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे विषय घेता येतील. संस्कृत हा विषयसुद्धा केवळ कला शाखाच नव्हे, तर पदवीचे शिक्षण घेणार्‍या वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना घेता येईल. यामुळे आपल्या आवडीच्या विषयात पदवी पूर्ण करता येईल.