इंडियानापोलिस (अमेरिका) – अमेरिकेतील इंडियाना राज्यात नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्याचा २८ जानेवारी या दिवशी मृत्यू झाला. नील हा उच्चशिक्षणासाठी येथील पर्ड्यू विद्यापिठात शिकत होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जानेवारीच्या सकाळी ११.३० वाजता विद्यापिठाच्या परिसरामध्ये एक मृतदेह असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
नीलची आई गौरी यांना नील १२ तासांपासून बेपत्ता असल्याचे समजल्यावर त्यांनी सामाजिक माध्यमांवरून याविषयी माहिती देऊन ‘त्याला शोधण्यात यावे’, असे आवाहन केले. त्यानंतर शिकागो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने सांगितले की, ते पर्ड्यू विद्यापिठाच्या संपर्कात आहेत. नीलचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहे.
सौजन्य इंडिया टूडे
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात विवेक सैनी या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्याची घटना घडल्याचे समोर आले होते.