भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक १३)
१. दुर्वास ऋषि यांच्या कोपामुळे विधायक कार्य होणे
‘शीघ्रकोपी, संतापी, शाप देणारे ऋषि म्हणून दुर्वास ओळखले जातात. राग हा त्यांचा दोष म्हणावा कि गुण ? हा संभ्रम पडतो. सूक्ष्म अभ्यासाने हे लक्षात येते की, रागाचा उपयोग विधायक गोष्टी घडवून आणणे, अहितकारी गोष्टी नष्ट करणे इत्यादीसाठीही होऊ शकतो. दुर्वास ऋषि रागीट होते; परंतु रागाचा वापर त्यांनी स्वार्थासाठी केला नाही. त्यामुळे शीघ्रकोपी म्हणून का होईना, वंदनीय ऋषीपद त्यांना मिळाले.
२. ऋषि दुर्वास यांची परीक्षा
एका प्रसंगात मात्र अयोग्य तर्हेने प्रकट केलेल्या रागामुळे दुर्वासांची परीक्षा घेतली गेली. साधन द्वादशीचे व्रत करणार्या अंबरीश राजाकडे दुर्वासमुनी एकादशी दिवशी गेले. ‘स्नान करून भोजनासाठी येतो’, असे सांगून सूर्यास्तापर्यंतही ते परतले नाहीत. इकडे व्रताच्या नियमाप्रमाणे भोजन करून पारणे फेडणे आवश्यक होते; पण दुर्वास ऋषि आल्याविना भोजन करता येईना आणि पारणे करता फेडल्याविनाही रहाता येईना; म्हणून राजाने भोजन न करता तीर्थ प्राशन करून पारणे फेडले. उशिरा परतलेल्या दुर्वासांना राजाचा राग आला. तीर्थप्राशन म्हणजे निम्मे भोजन असते. ते करून राजाने आपला अपमान केला आहे, या रागाने दुर्वासांनी राजाला मारण्यासाठी कृत्या निर्माण केली; परंतु भगवान विष्णूंच्या सुदर्शनचक्राने कृत्येला नष्ट केले. नंतर सुदर्शनचक्र दुर्वास ऋषींकडे जाऊ लागले. स्वतःचा बचाव करण्यासाठी दुर्वास ऋषि भगवान विष्णूंना शरण आले. विष्णूंनी त्यांना सांगितले की, आता हे चक्र थांबवण्याची क्षमता केवळ अंबरीशात आहे. दुर्वास राजाला शरण आले, तेव्हा सुदर्शनचक्र थांबले. निसर्ग नियमांपलिकडे ऋषीच काय; पण देवही जाऊ शकत नाहीत.
३. दुर्वासांनी दिलेले वर, शाप आणि उःशाप
दुर्वासांनी क्रोधाने अनेक जणांना शाप दिले. याविषयी लक्ष्मण, इंद्र, धर्म, शकुंतला इत्यादींच्या कथा लोकप्रिय आहेत. अर्थात् शापानंतर उःशाप देण्याची पद्धतही दुर्वासांनी पाळली होती. त्यामुळे शाप हे काही काळापुरते शासन आणि अंतिम कल्याण करणारे असायचे. शापाप्रमाणे दुर्वास ऋषींनी मुद्गल ऋषि, कुंती, श्रीकृष्ण इत्यादींना दिलेले वरही प्रसिद्ध आहेत. कुंतीला दुर्वासांनी दिलेल्या पुत्रप्राप्तीच्या मंत्रामुळे पुढे पांडू राजाचा वंश वाढला. अंगिरा कुळातील मुद्गल ऋषींची परीक्षा घेऊन दुर्वासांनी त्यांना सदेह स्वर्गात जाण्याचा वर दिला; मात्र ज्ञानी मुद्गलांनी स्वर्गसुख नाकारून पृथ्वीवर रहाणे पसंत केले.
एकदा दुर्वास ऋषींना श्रीकृष्णाने नम्र अभिवादन करून त्यांना खीर ग्रहण करण्याची विनंती केली. अर्धी खीर खाऊन त्यांनी उरलेली खीर श्रीकृष्णाला सर्वांगास लावण्यास सांगितली. श्रीकृष्णाने आज्ञा पाळली; पण ‘ऋषींचा प्रसाद तळपायास कसा लावावा ?’ या विचाराने तळपाय सोडून दिले. त्या तळपायावर बाण लागूनच पुढे कृष्णाची अवतार समाप्ती झाली. भगवान श्रीकृष्णाची कठोर परीक्षा घेऊन त्यांना वरदान देणारे ते तपस्वी ऋषि दुर्वास होते, हे ओळखायला वेळ लागणार नाही.
४. दुर्वास ऋषि यांच्या जन्माची कथा
दुर्वास हे महर्षि अत्रि आणि महातपस्विनी अनसुया हिचे पुत्र होत. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश या तिन्ही देवांनी अनसूयेच्या सतित्वाची परीक्षा घेतली. त्याचा परिणाम म्हणून तिन्ही देवांचे रूपांतर बाळामध्ये झाले. हे पाहून तिन्ही देवांच्या पत्नी सावित्री, रमा आणि उमा चिंताग्रस्त झाल्या. तेव्हा तिन्ही देवांनी स्वतःचे मूळ रूप धारण केले. त्यांनी महर्षींना आणि अनसूयेला आपापल्या अंशापासून पुत्रप्राप्ती होण्याचा आशीर्वाद दिला. पुढे ब्रह्मदेवाच्या अंशाने सोम (चंद्र), विष्णूच्या अंशाने दत्तात्रेय आणि महेशाच्या अंशाने दुर्वास यांनी अनसूयेच्या उदरी जन्म घेतला.
५. ऋषि दुर्वास यांचे व्यक्तीमत्त्व
मृत्यूच्या देवाचे शंकराचे अंश, म्हणजे दुर्वास. त्यामुळे दुर्वासांचे व्यक्तीमत्त्व एकांतप्रिय, विजनवासी, कोपिष्ट असे होते. दुर्वासांच्या अस्तित्वाविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. वैराग्य या गुणवैशिष्ट्यामुळे ते लोक संग्रहापेक्षा समाजविन्मुख राहिल्याचे अधिक आढळते.
उंच शरीरयष्टी, पिंगट हिरवा वर्ण, कृश, लांब दाढी, पिंजारलेले केस, जीर्णशीर्ण वल्कले असे दुर्वासांचे बाह्यरूप होते. एकूणच त्याचे रूप भितीदायक आणि उग्र होते. अनेकांनी दुर्वासांचा राग अनुभवला, शाप अनुभवले. त्यातून जे तरुन गेले, त्यांनी दुर्वासांकडून वरदानही प्राप्त केले.
दुर्वासांनी और्वमुनींची कन्या कंदली हिच्याशी विवाह केला होता. दुदैवाने कंदली ही कलहप्रिय होती. दुर्वासांशी ती सतत भांडत राही. तिचे १०० अपराध भरल्यानंतर मात्र दुर्वासांनी तिला शाप देऊन भस्मसात केले. कन्याविरहाने दुःखित झालेल्या और्वमुनींनी दुर्वासांना शाप दिला, ‘‘तुझा पराभव होईल.’’ या शापानुसार अंबरीश राजाच्या सत्त्वपरीक्षेच्या घटनेत दुर्वासांना पराभव पत्कारावा लागला.
६. ऋषि जगतातील महत्त्वाचे स्थान
दुर्वास हे सामवेदी आचार्य होते. आर्याद्विशती, देवीमहिम्नस्तोत्र, परशिवमहिम्नस्तोत्र, ललितास्तवरत्न इत्यादी साहित्यनिर्मिती त्यांनी केली. १८ उपपुराणांमध्ये एक दुर्वास पुराण आहे. अतीक्रोध, विक्षिप्तपणा, कठोर भाष्य इत्यादी अवगुण दुर्वास चरित्राला चिकटलेले आढळले, तरी निस्वार्थ हेतू, दूरदृष्टी आणि विरक्त जीवन इत्यादी गुणांमुळे दुर्वासांनी एक महत्त्वाचे स्थान ऋषिजगतात प्राप्त केले.’
– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’ फेब्रुवारी २००६)