प्रभु श्रीराम : भारतीय जीवनाचा आदर्श !

खरे तर हा विषय एखाद्या पुस्तकाचा होईल एवढा मोठा आहे. त्यामुळे अगदी एक-दोन मुद्दे घेऊन श्रीरामाच्या विशेषत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीराममंदिराचे उद्घाटन हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज प्रभूंचे जन्मस्थान मोकळे झाले आहे. अनेक पिढ्यांच्या लढ्याला यश आले आणि आपण अजूनही ‘श्रीराम दिवाळी’ साजरी करत आहोत ! रामायणाचा आरंभ ज्या बालकांडाने होतो त्याचे ७७ सर्ग आहेत. याचा प्रारंभ अतिशय उदात्त अशा भावनेतून झाला आहे. त्यावरून पुढचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास सहज लक्षात येतो. नारद आणि महर्षि वाल्मीकि यांच्या संवादातून हा ‘काव्येतिहास’ कसा आकाराला येणार आहे, ते कळू शकते. त्या संवादातून महर्षि वाल्मीकींची मनोधारणा ही किती उच्च प्रतीची आहे, ते प्रतित होते.

१. महर्षि वाल्मीकींनी वर्णिलेली ब्रह्मर्षि नारदांची महती

बालकांडाचा पहिला श्लोकच पहा.

ॐ तपः स्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरम् ।
नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवम् ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक १

अर्थ : तपस्वी वाल्मीकींनी तपस्या आणि स्वाध्यायात मग्न रहाणार्‍या, विद्वानांमध्ये श्रेष्ठ मुनीवर नारदांना विचारले.

या पहिल्याच श्लोकात ब्रह्मर्षि नारदांची महती महर्षि वाल्मीकींनी सांगितली आहे. आपण मात्र नारदांना ‘कळलाव्या’ असे समजतो. त्यांचे मालिकांमध्ये तसेच चित्रण केले जाते. भगवंताचे श्रेष्ठ भक्त असलेल्या नारदांचे चरित्र समजून घ्यायचे असेल, तर ‘भागवत’ ग्रंथ वाचायला हवा. तिन्ही लोकांत संचार करणारे आणि सर्व ठिकाणची वृत्ते जवळ असणारे नारद म्हणजे आद्यपत्रकार होत. अत्यंत निरासक्त, प्रेमळ, निर्मळ, निर्लेप असे हे महामुनी आहेत. त्यांनी दुष्टांच्या निर्दालनासाठी प्रयत्न केलेले दिसतात, तसेच असुरांना सुधारण्यासाठी ते उपदेश करतांनाही दिसतात. हेच त्यांचे मोठेपण आहे. केवळ ‘नारायण-नारायण’ म्हणत देवतांचे गोडवे गाणारे स्तुतीपाठक इतकेच त्यांचे कार्य नव्हे, हे लक्षात घ्यावे.

२. महर्षि वाल्मीकींनी ब्रह्मर्षि नारदांना गुणवान नायकाविषयी केलेली विचारणा

डॉ. सच्चिदानंद शेवडे

ब्रह्मर्षि नारदांना तेवढेच अधिकारी असलेले महर्षि वाल्मीकि अत्यंत नम्रतेने विचारतात की,

को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ।
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक २

अर्थ : (हे मुनी) या समयी या जगात गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, उपकार जाणणारा, सत्य वक्ता आणि दृढ प्रतिज्ञ कोण आहे ?

चारित्रेण च को युक्त: सर्वभूतेषु को हित: ।
विद्वान् क: क: समर्थश्च कश्चैकप्रियदर्शन: ।।
आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् कोऽनसूयक: ।
कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक ३ आणि ४

अर्थ : चारित्र्यसंपन्न, सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर, विद्वान, सामर्थ्य संपन्न, अत्यंत सुंदर, मनोनिग्रही, जितेंद्रिय, क्रोधावर मात केलेला, तेजस्वी, कुणाचाही मत्सर न करणारा, युद्धाच्या वेळी रागावला असता ज्याला देवही भीतात, असा पुरुषोत्तम कोण आहे बरे ?

एतदिच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे ।
महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुमेवंविधं नरम् ।।
– वाल्मीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग १, श्लोक ५

अर्थ : हे जाणण्याची मला इच्छा आहे; नव्हे नव्हे फारच उत्सुकता आहे. हे महर्षि, असा पुरुष केवळ आपल्यालाच ठाऊक असणे शक्य आहे. (कारण आपण सर्वत्र संचार करणारे असून आपल्याला दिव्य दृष्टी आहे).

ही १५ विशेषणे वाचली, तरी महर्षि वाल्मीकींना त्यांचा नायक कसा हवा होता ? याची कल्पना येते. खरे तर या एकेका गुणांनीयुक्त असलेली एकेक व्यक्ती असू शकते. तथापि हे सर्व गुण एकत्रित असलेला असा महामानव त्यांच्या दृष्टीसमोर होता. अशा कुणाचेच नाव त्यांनी अद्याप ऐकले नव्हते. किंबहुना हे सर्व गुण एकत्रित असलेला कुणी मानव असेल का ? या शंकेनेही ते ग्रस्त असावेत. त्यामुळे शंका निरसनार्थ त्यांनी ब्रह्मर्षि नारदांना हा प्रश्न विचारला, हे सहज ध्यानात येते.

३. ब्रह्मर्षि नारदांनी प्रभु श्रीरामाचे केलेले गुणवर्णन

महर्षि वाल्मीकींच्या प्रश्नामुळे नारद आनंदी झाले आणि म्हणाले, ‘तुम्ही विचारलेले गुण अनेक असून ते एकत्रित असणे दुर्लभच आहे. तथापि मी स्मरण करून सांगतो, ते नीट आणि सावधपणे ऐकावे.’ असे म्हणून पहिल्या सर्गातील ८ ते २० श्लोक हे निव्वळ प्रभु श्रीरामाच्या वर्णनाचे आहेत. ते संपूर्ण न देता त्या श्लोकातील रामाची विशेषणे सांगत आहे. ते म्हणतात, ‘ईक्ष्वाकु कुळात जन्मलेला आणि ‘राम’ नावाने प्रसिद्ध असलेला पुरुष लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तो आत्मसंयमी, महावीर्यवान, तेजस्वी, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धीमान, नीतीज्ञ, वक्ता, वैभवशाली, शत्रूनाशक, उन्नत स्कंध, महाबाहू, शंखासारखी मान असलेला, मोठी हनुवटी, विशाल वक्षस्थळ, मोठे धनुष्य धारण करणारा, अदृश्य स्कंधसंधी, अजानबाहू, उत्कृष्ट मस्तक, उत्तम कपाळ, प्रशस्त गती, प्रमाणबद्ध देह, परस्परांशी समान आणि परस्परांपासून भिन्न असे नेत्रादी अवयव, आकर्षक रंग, प्रतापी, पुष्ट आणि उन्नत वक्षस्थळ असलेला, विशाल नेत्र, ऐश्वर्यवान, शुभलक्षणी, धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहितदक्ष, यशस्वी, ज्ञानसंपन्न, पवित्र, विनयी आणि समबुद्धीने युक्त आहे.’

पुढे नारद म्हणतात, ‘तो ब्रह्मदेवाप्रमाणे ऐश्वर्यसंपन्न, प्रजापालक, शत्रूनाशक, प्राणिमात्रांचे रक्षण करणारा, धर्मरक्षक, स्वधर्मरक्षक, स्वजनरक्षक, वेद आणि वेदांगे यांतील तत्त्व जाणणारा, धनुर्वेदप्रवीण, सर्व शास्त्रांचे तत्त्व जाणणारा, स्मृती आणि समयस्फूर्ती असलेला, सर्व लोकांना आवडणारा, सौम्य तथा सज्जन, उदार, सर्व कर्मांमध्ये कुशल असलेला, सुसंस्कृत, सर्वांशी समान वागणारा, लोकांना सदैव त्याचे दर्शन प्रिय असते, नद्या ज्याप्रमाणे समुद्राकडे येतात, त्याप्रमाणे सज्जन त्याच्याकडे जातात, सर्वगुणसंपन्न, कौसल्येचा आनंद द्विगुणित करणारा, समुद्रासारखा गंभीर, हिमालयाप्रमाणे धैर्यवान, पराक्रमात श्रीविष्णूशी बरोबरी करणारा, चंद्राप्रमाणे त्याचे दर्शन सर्वांना प्रिय आहे, क्रोधात प्रलयकारी अग्नीशी साम्य असलेला, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, धनाचा व्यय करण्यात कुबेरासमान असलेला, सत्यवचनाविषयी तर दुसरा मूर्तीमान धर्मच असलेला, अमोघ पराक्रमी, बहुगुणसंपन्न, श्रेष्ठ गुणांनीयुक्त, प्रजाजनांच्या हिताची कृत्ये करण्यास अत्यंत तत्पर असलेला असा तो श्रेष्ठ पुरुष आहे.’

हे सर्व गुण नीट वाचले आणि समजून घेतले, तरी श्रीरामांचे महत्त्व पटावे. खरे तर या एकेक गुणांवर स्वतंत्र लेख लिहावे लागतील. क्वचित् काही ठिकाणी पुनरुक्ती वाटेल तथापि नीट विचार केला, तर त्यांचे महत्त्व पटावे. जगात होऊन गेलेले अनेक श्रेष्ठ लोक एखाद्या गुणवैशिष्ट्यांमुळे मोठे झाल्याचे लक्षात येईल. अर्थात् त्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचलेले असते. इथे ७० हून अधिक गुण एका श्रीरामामध्ये एकवटले आहेत हे पाहिले की, त्याचे विभूतीत्व लक्षात येते. हे गुण वाचतांना यांतील किमान एखादा गुण तरी आपल्यात यावा, अशी इच्छा आणि जिद्द निर्माण झाली तरी पुष्कळ झाले. या गुणसमुच्चयामुळे श्रीराम हे जगातील एक आदर्श नायक ठरतात.

४. राज्याभिषेक निश्चिती

पुढे दशरथाचा श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा मनोदय ऐकून सर्व राजे, मान्यवर, सर्व वर्णातील जनपुढारी आदी समस्त लोकांनी एका सुरात रामाच्या नावाला पाठिंबा दिला. या वेळी सर्वांनी श्रीरामाचे गुणगान करून यौवराज्याभिषेक करण्यास तेच योग्य असल्याचे सांगितले. ते ऐकताच हर्षभरित होऊन दशरथाने श्रीरामाला जो उपदेश केला आहे, तो खरे तर सर्व राजांनी अथवा राजकारणातील लोकांनी ध्यानात घेण्यासारखा आहे. त्यावरून ‘रामराज्य’ हे नाव असलेली संकल्पना मुळात वास्तवातील रघुकुळाची परंपरागत राज्यव्यवस्था होती, हे लक्षात येईल.

राजा दशरथ म्हणतो,

‘कामतस्त्वं प्रकृत्यैव विनीतो गुणवानिति ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३, श्लोक ४१

गुणवत्यपि तु स्नेहात्पुत्र वक्ष्यामि ते हितम् ।
भूयो विनयमास्थाय भव नित्यं जितेन्द्रियः ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३, श्लोक ४२

अर्थ : मुला, तू स्वभावाने गुणवान आहेस; तथापि तू सद्गुणसंपन्न असला, तरीही मी स्नेहवश होऊन तुला हिताच्या काही गोष्टी सांगत आहे. तू अधिकच विनयाचा आश्रय घेऊन सदा जितेंद्रिय बनून रहा.

कामक्रोधसमुत्थानि त्यजस्व व्यसनानि च ।
परोक्षया वर्त्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया तथा ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३, श्लोक ४३

अर्थ : काम आणि क्रोध यांमुळे उत्पन्न होणार्‍या दुर्व्यसनांचा सर्वथा त्याग कर. परोक्ष वृत्तीने (म्हणजेच गुप्तचरांकडून यथार्थ गोष्टींचा पत्ता लावून घेऊन) तथा प्रत्यक्ष वृत्तीने (म्हणजेच दरबारात समोर येऊन सांगणार्‍या जनतेच्या मुखाने त्यांचे वृतांत प्रत्यक्ष पाहून-ऐकून) यथायोग्य न्यायविचारात तत्पर रहा.

अमात्यप्रभृतीः सर्वाः प्रजाश्चैवानुरञ्जय ।
कोष्ठागारायुधागारैः कृत्वा सन्निचयान्बहून् ।।
इष्टानुरक्तप्रकृतिर्यः पालयति मेदिनीम् ।
तस्य नन्दन्ति मित्राणि लब्ध्वामृतमिवामराः ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३, श्लोक ४४ आणि ४५

अर्थ : मंत्री, सेनापती आदी समस्त अधिकार्‍यांना, तसेच प्रजाजनांना सदा प्रसन्न राख. जो राजा कोष्ठागार (भांडारगृह) तथा शस्त्रागार आदींद्वारे उपयोगी वस्तूंचा फार मोठा संग्रह करून (मंत्री, सेनापती आणि प्रजा आदी) समस्त प्रकृतींना प्रिय मानून त्यांना आपल्या प्रति अनुरक्त अन् प्रसन्न राखून पृथ्वीचे पालन करतो, त्याचे मित्र, जसे अमृत मिळाल्याने देव प्रसन्न झाले होते, त्या प्रकारे आनंदित होतात.

तस्मात्पुत्र त्वमात्मानं नियम्यैवं समाचर ।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३, श्लोक ४६

अर्थ : म्हणून पुत्रा, तू आपल्या चित्ताला आपल्या नियंत्रणात ठेवून या प्रकारच्या उत्तम आचरणाचे पालन करत रहा.

५. सर्व प्रकारच्या आदर्शांसाठी रामायण वाचणे महत्त्वाचे !

प्रभु श्रीराम हे क्षणात राज्यप्राप्तीमुळे हुरळून गेलेले दिसत नाहीत आणि लगेच राज्य त्यागाच्या आपत्तीमुळे खचून गेलेले दिसत नाहीत. हाच त्यांचा मोठेपणा आहे. किंबहुना यशामुळे हवेत न उडणे आणि अपयशामुळे खचून न जाणे, या गोष्टी आपल्याला यातून शिकता येतात ! रामायण हे सर्व प्रकारच्या आदर्शांसाठी वाचायचे असते. रामकथेमधून वैयक्तिक आयुष्यात पुष्कळ काही शिकता येते. श्रीराममंदिर हे केवळ एक मंदिर नसून ते ‘राष्ट्रमंदिर’ आहे, ही प्रेरणा घ्यायला हवी !

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, रामायणाचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ‘राममंदिरच का ?’, या पुस्तकाचे लेखक, डोंबिवली.

(साभार : फेसबुक आणि दैनिक ‘नवप्रभा’)

संपादकीय भूमिका 

आजच्या कथित लोकप्रतिनिधींनी प्रभु श्रीरामावर टीका करण्यात धन्यता मानण्यापेक्षा त्याचे गुण जीवनात आचरणे महत्त्वाचे !