मोहनदास गांधी यांच्या हत्येमागे कोण आहे ? – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

  • श्री. रणजीत सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे प्रकाशन 

  • केंद्र सरकारने आयोग नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत ! 

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी डावीकडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. राजीव सोनी आणि श्री. रणजीत सावरकर

नवी देहली – मोहनदास गांधींना मरू देण्यामागे कुणाचे अदृश्य हात होते ? कुठल्या राजसत्तेला गांधींना मरू द्यायचे होते ? गांधी यांच्या शरिरात आढळलेल्या आणि नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून ज्या गोळ्या चालवण्यात आल्या, त्याने गांधींचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे गांधींच्या हत्येमागे कोण आहे ? असा प्रश्‍न स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी उपस्थित केला. २९ जानेवारी २०२४ या दिवशी श्री. रणजीत सावरकर यांनी ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी वरील प्रश्‍न उपस्थित केला. या वेळी ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे माजी संपादक तथा राजकीय तज्ञ श्री. राजीव सोनी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

सौजन्य झी २४ तास 

या वेळी पुस्तकाचे संपादन करणारे सर्वश्री मंगेश जोशी, धनंजय शिंदे, अनिल त्रिवेदी, दीपक कानूलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्यवीर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले.

श्री. रणजीत सावरकर म्हणाले की,

१. नथुराम गोडसे हे केवळ रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे संघ आणि हिंदु महासभा यांवर बंदी घालण्यात आली होती.

२. गांधींनी ‘हे राम’ म्हणत प्राण सोडले. त्यानंतर श्रीरामाचे नाव घेऊन मोठे पाप दाबण्यात आले होते. ते या पुस्तकातून समोर येईल.

३. नथुराम यांच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही. याविषयी कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला होता.

४. नथुराम गोडसे गुन्हेगार नव्हते. त्यामुळे त्यांनी बंदुकीने झाडलेल्या गोळीने निशाणा लागणे शक्य नव्हते. हे सगळे पुरावे पहाता गोडसेने महात्मा गांधींना मारले नाही. गांधींचा मृत्यू अन्य लोकांनी गोळ्या झाडल्यामुळे झाला. ‘ते कोण होते ?’, याचे अन्वेषण करायला हवे.

५. यानंतर घटनेनंतर काँग्रेसमधील वल्लभभाई पटेल यांचा गट संपवण्यात आला. त्यानंतर भारताने ग्रेट ब्रिटनशी व्यापार चालू केला. पंडित नेहरू आणि ब्रिटन यांना याचा लाभ झाला.

६. माझे आवाहन आहे की, गांधींच्या हत्येनंतर २० वर्षांनी कपूर आयोग नेमण्यात आला, त्याच प्रकारे आताही केंद्र सरकारने आयोग नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत. गांधी हत्येचे जे पुरावे दडपण्यात आले होते. त्यावर चौकशी चालू करावी.

पुस्तक प्रकाशित न होण्यासाठी दबाव !

‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

‘मेक शुअर गांधी इज डेड’ हे पुस्तक प्रकाशित न होण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला; पण मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केले. अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला होता, असेही श्री. रणजीत सावरकर यांनी सांगितले.

…पण नेमके सत्य काय ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

गांधी राष्ट्रपिता होते, तर त्यांना आवश्यक ती सुरक्षा देणे, हे शासनाचे कर्तव्य होते. हत्येच्या काही दिवस आधीपर्यंत त्यांना अशी सुरक्षा काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा पोलीस पुरवतच होते. ही सुरक्षा का काढून घेण्यात आली होती ? गांधींना लागणारी आवश्यक ती औषधे नेमक्या त्या दिवशी का उपलब्ध नव्हती ? गोळ्या झाडल्यानंतरही साधारण २८ मिनिटे गांधी जिवंत होते. या काळात त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न का झाला नाही ? २० जानेवारी १९४८ या दिवशी गांधींच्या हत्येचा प्रयत्न फसला. मदनलाल पहावा यांना अटक झाली, त्या वेळी त्यांच्याकडून महाराष्ट्रातील काही नावे कळाली होती. त्याच्या आधारे नथुराम गोडसे यांना अटक करणे सहज सोपे असतांनाही पोलिसांनी त्या दृष्टीने अन्वेषण केले नाही. यामुळेच ३० जानेवारीला गांधींवर पुन्हा गोळ्या झाडण्यात आल्या. हे अन्वेषण ज्यांनी केले नाही, त्यांना कोणतीच शिक्षा झाली नाही.

ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या गेल्या, असे मानले जाते, त्या गोळ्या आणि जखमांचे आकार जुळत नाहीत. ‘शरिरात घुसणारी गोळीची जागा आणि शरिरातून बाहेर पडणारी गोळीची जागा यांची दिशा पाहिली, तर गांधी यांच्यावर त्यांच्यापेक्षा उंच असणार्‍या व्यक्तीने गोळ्या झाडल्या असाव्यात’, असे दिसते. प्रत्यक्षात नथुराम गोडसे आणि गांधी यांच्या उंचीमध्ये फारसा फरक नव्हता, मग ‘जखमा अशा कशा झाल्या असतील ?’, याचा शोध घेतला गेला नाही. याचसमवेत ‘गोळ्या आणि काडतुसे जिथे पडलेली सापडली’, असा पंचनामा पोलिसांनी केला आहे, तो सदोष आहे. या संदर्भात न्यायाधिशांनी प्रश्‍न विचारलेच नाहीत. नथुराम गोडसे यांनीच खून केल्याचे मान्य केले असल्यामुळे अशा अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची उलट तपासणी घेतली नाही; पण नेमके सत्य काय होते ? आणि प्रत्यक्षात काय झाले होते ?, हे शोधण्याचे काम न्यायाधिशांचेही आहे. त्यांनी प्रश्‍न विचारायला हवे होते.

गुन्हेगारांना वाचवणारे कोण ? – राजीव सोनी, ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे माजी संपादक तथा राजकीय तज्ञ

या पुस्तकाचे आयोजन हा एका आंदोलनाचा प्रारंभ आहे. गांधींची हत्या गोडसे यांनी केलेली नसून ती वेगळ्या व्यक्तींनी केल्याचे षड्यंत्र होते. या माध्यमातून खर्‍या गुन्हेगारांना वाचवण्यात आले आहे. यामुळे ‘लाभ कुणाचा झाला ?’, हे बघावे लागेल. यामुळे ‘गुन्हेगारांना वाचवणारे ते लोक कोण होते ?’, याचा शोध घेणे काळाची आवश्यकता आहे.