मिरज, २४ जानेवारी (वार्ता.) – विश्व हिंदु परिषदेने पुकारलेल्या श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांतील हिंदु एकता आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तसेच बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी ते आघाडीवर होते. त्यामुळेच त्यांचे हे योगदान कदापी विसरता येणार नाही, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी येथे केले.
हिंदु एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या हिंदु एकता आंदोलनाच्या कारसेवकांचा सत्कार सोहळा मिरज येथील हिंदमाता चौक येथे नुकताच पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये सर्वश्री सुरेश शेळके, विनायक शिंगाणा, शहाजी कांबळे, संजय धामणगावकर या कारसेवकांचा भगवी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका युवतीची सुटका करण्यात प्रमुख सहभाग घेतलेल्या हिंदु एकता आंदोलनाचे श्री. अमित सूर्यवंशी आणि श्री. अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी हिंदु एकता आंदोलन संघटनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्री. राजू जाधव, खणभाग विभागाध्यक्ष म्हणून श्री. अवधूत जाधव, सांगलवाडी विभागाध्यक्ष म्हणून श्री. अनिरुद्ध कुंभार, सर्वश्री रवींद्र पवार आणि श्री. श्रीकांत चोरगे मिरज शहर उपाध्यक्ष यांच्या निवडीची पत्रे देण्यात आली. प्रास्ताविक हिंदु एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते श्री. दत्ताअण्णा भोकरे यांनी केले. हिंदु एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते श्री. किशोरदादा जामदार, श्री. अनिलअण्णा रसाळ यांनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले.
जमलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे स्वागत संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. परशुराम चोरगे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपात हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी आभार मानले. या वेळी सर्वश्री विष्णूपंत पाटील, पै. विजय टोणे, अमित सूर्यवंशी, अशोक पाटील, श्रीनिवास नाझरे, मोहन वाटवे आदी मान्यवर उपस्थित होते.