मनोज जरांगे यांना न्यायालयाची नोटीस !
मुंबई – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपिठापुढे तातडीची सुनावणी झाली. मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक यांना मुंबईत आंदोलनाची अनुमती न देण्याची मागणी सदावर्ते यांनी स्वत:च्या याचिकेतून केली आहे.
न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करतांना सांगितले, ‘‘मुंबईतील मराठा आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही, हे दायित्व राज्य सरकारचे आहे. सहस्रो बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचे, हे राज्य सरकार बघेल.’’ मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे, तर सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.