सातारा, १९ जानेवारी (वार्ता .) – अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या वतीने श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ५०० वर्षांनंतर पुन्हा एकदा हा नेत्रदीपक सोहळा समस्त हिंदूंना पहायला मिळणार आहे. यानिमित्ताने श्रीक्षेत्र चाफळ येथील श्रीराममंदिरात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दासबोध अभ्यास मंडळ, हिंदू एकता आंदोलन आणि श्रीक्षेत्र चाफळ ग्रामस्थ या सोहळ्याच्या आयोजनामध्ये सहभागी होणार आहेत.
१. २२ जानेवारी या दिवशी पहाटे ४.४५ वाजता प्रभु श्रीरामाची काकड आरती होईल. नंतर सकाळी ८ वाजता भजन होईल. सकाळी १० वाजता रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि मनोबोध यांचे पठण होईल.
२. सकाळी ११ वाजता अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घडवण्यात येईल. दुपारी १२ वाजता आरती आणि प्रसाद होईल. दुपारी १ वाजता महाप्रसाद झाल्यावर दुपारी ३ ते ५ यावेळेत कराड येथील ह.भ.प. सौ. श्रद्धा स्वानंद पाठक यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.
३. सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव आणि प्रसाद वाटप होईल. रात्री ८ वाजता महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तरी श्रीक्षेत्र चाफळ आणि पंचक्रोशीतील समस्त श्रीरामभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.