परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रथोत्सवाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त रथोत्सव झाला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्सवाच्या सरावाच्या वेळी

श्रीमती संध्या बधाले

१ अ. रथोत्सवाच्या सरावाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आकाशातून सराव पहात आहेत’, असे वाटून भावजागृती होणे : ‘आम्ही ५ दिवस रथोत्सवात चालण्याचा सराव करत होतो. पहिल्या दिवशी मला आकाशात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पूर्ण रूप दिसत होते. ‘ते सराव पहात आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली. मला ‘हा सराव संपूच नये’, असे वाटत होते.

२. रथोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले रथोत्सवात उपस्थित आहेत’, हे ऐकून भाव जागृत होणे : रथोत्सवाला आरंभ होण्यापूर्वी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथात बसले आहेत. परात्पर गुरुदेवांनी प.पू. दास महाराज यांनी दिलेली रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली आहे आणि त्यांनी दिलेली गदा रथात ठेवली आहे.’’ हे ऐकून माझा भाव जागृत झाला.

२ आ. रथ आश्रमातून बाहेर आल्यावर मला दिसले, ‘साक्षात् नारायणस्वरूप गुरुमाऊली भूमीवर आली आहे आणि सर्व देवता तिच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत.’

२ इ. ‘रथात सनातनच्या ३ गुरूंच्या समवेत सूक्ष्मातून मारुतिराया आहे’, असे पुष्कळ वेळ दिसणे : ‘रथात साक्षात् नारायणस्वरूप गुरुमाऊली आणि दोन देवी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ), तसेच त्यांच्या समवेत मारुतिराया आहे’, असे चित्र माझ्या डोळ्यांसमोर पुष्कळ वेळ होते. तेव्हा मला वाटले, ‘श्रीरामाच्या सेवेत मारुतिराया असतो, त्याप्रमाणेच रथात श्रीरामस्वरूप गुरुमाऊलींच्या समवेत साक्षात् मारुतिराया आहे.’

२ ई. खरेतर आम्ही काही साधक रथाच्या मागे होतो. आम्हाला रथारूढ परात्पर गुरुदेव दिसत नव्हते, तरीही ‘परात्पर गुरुदेव आमच्या समवेत सतत आहेत’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

२ उ. साधिकेने अनुभवलेली भावस्थिती : पूर्वी परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर माझा भाव थोडा वेळ जागृत होत असे; मात्र रथोत्सवाच्या वेळी रथोत्सव पूर्ण होईपर्यंत माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. ‘मी पृथ्वीवर नसून एका वेगळ्याच विश्वात आहे आणि तेथे सर्व देवता आहेत’, असे चित्र माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते.

२ ऊ. रथोत्सवात ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ ही धून लावल्यावर : ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ ही धून लावल्यावर मला एक कोकीळा गात असल्याचा आवाज येत होता; पण आजूबाजूला कोकीळा दिसत नव्हती. ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ ही धून लावल्यावर आमच्या जवळ २ – ३ गायी आल्या.

२ ए. मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे असलेल्या साधकांनी अनुभवलेली भावस्थिती : सनातनच्या ३ गुरूंच्या स्वागतासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूला साधक उभे होते. तेव्हा साधकांची पुष्कळ भावजागृती होत होती. त्यांना पाहून माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबत नव्हते. ‘सर्व जिवांवर देवाची दृष्टी पडली आणि ते भावस्थिती अनुभवत आहेत’, असे मला वाटत होते.

२ ऐ. परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : संपूर्ण रथोत्सवात मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘नारायणस्वरूप गुरुदेव सतत माझ्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.

२ ओ. वायुदेवतेला झालेला आनंद : रथोत्सवात मधे मधे थंड वार्‍याची झुळूक येत होती. तिचा स्पर्श मला होत होता. तेव्हा ‘वायुदेवतेलाही पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला वाटत होते.

२ औ. आनंदित झालेली अवघी सृष्टी : ‘भगवंत भक्तांच्या भेटीसाठी भूमीवर अवतरला आहे. सर्व सजीव, झाडे आणि निर्जीव वस्तू श्रीमन्नारायणाच्या दर्शनाने आनंदी झाले आहेत’, असे मला वाटले.

२ क. रथोत्सवात शारीरिक त्रासाची जाणीव न होणे : खरेतर मला असलेल्या शारीरिक त्रासामुळे मी १० मिनिटेही चालू शकत नाही; मात्र पूर्ण रथोत्सवात मला शारीरिक त्रासाची काहीच जाणीव झाली नाही. मला त्या वेळी तहान-भूकेचीही जाणीव नव्हती.

२ ख. ‘रथोत्सवाची सांगता कधी झाली ?’, ते मला समजलेच नाही.

२ ग. हा रथोत्सव पाहून ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटत होते. ‘माझ्या डोळ्यांतील अश्रू गुरुदेवांच्या चरणांवर पडून चरणांचा अभिषेक होत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

३. रथोत्सवानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. रथोत्सव झाल्यावरही माझ्या मुखात ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ असे येत होते.

आ. मला रात्री झोपेतही ‘रथात परात्पर गुरुदेव आणि समवेत दोन देवी आहेत’, असे दिसत होते.

४. कृतज्ञता

आमच्या जीवनातील हा अनमोल क्षण आम्ही कधीच विसरणे शक्य नाही. ‘माझी पात्रता नसतांनाही मला रथोत्सवात सहभागी करून घेतले आणि मला आनंद अनुभवायला दिला’, त्याबद्दल देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक