श्री रामलला मंदिरात स्थापित होईपर्यंत अन्नग्रहण न करण्याचा केला होता निर्धार
दरभंगा (बिहार) – जिल्ह्यातील बहादूरपूर तालुक्यातील खैरा गावात रहाणारे वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली बाबा ३१ वर्षांनंतर अन्नग्रहण करणार आहेत. झमेली बाबा हे रामसेवक असून ३१ वर्षांपासून फळे खाऊन जीवन जगत आहेत. ‘जेव्हा प्रभु श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात प्रवेश करती, तेव्हा स्वत:च्या हातांनी अन्न शिजवून ते ग्रहण करणार’, असा निर्धार त्यांनी केला होता.
झमेली बाबा लहानपणापासून स्वयंसेवक होते. विश्व हिंदु परिषदेच्या आवाहनावरून ते दरभंगा येथून अनुमाने अडीचशे कारसेवकांसह अयोध्येला गेले होते. तेथे बाबरी ढाचा पाडण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी झाले होते. बाबरी ढाच्यावर चढून तो तोडल्यानंतर ७ डिसेंबर १९९२ या दिवशी त्यांनी ‘मंदिर बांधेपर्यंत फळे खाऊन जीवन जगणार’, अशी शपथ घेतली होती. झमेली बाबा अविवाहित असून त्यांनी स्वत:चे आयुष्य श्रीरामसेवेसाठी समर्पित केले आहे.