Goa Police : पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेट द्या ! – पोलीस महासंचालक जसपाल सिंह

पोलीस महासंचालकांचा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना आदेश

पणजी, १६ जानेवारी (वार्ता.) : पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी पोलीसदल गतीशील करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना राज्यातील पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेटी देऊन पोलीस ठाण्यातील त्रुटी आणि चांगल्या गोेष्टी यांविषयी अहवाल सिद्ध करावा, असा आदेश दिला आहे. आकस्मिक भेट देण्याच्या शक्यतेवरून पोलीस ठाणे स्वच्छ ठेवणे, पोलीस कर्मचारी सेवेच्या वेळी ठाण्यात उपस्थित असणे आदी अनेक गोष्टी आपसुकच होणार आहेत.

पोलीस महासंचालक जसपाल सिंह

पोलीस महासंचालक जसपाल सिंह म्हणाले, ‘‘पोलीस ठाण्याचे निरीक्षण करतांना तेथील चांगल्या गोष्टी आणि त्रुटी यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे. पोलीस ठाणे असलेल्या इमारतीची योग्यरित्या निगा राखली पाहिजे आणि प्रत्येक शनिवारी पोलीस ठाण्यात ‘श्रमदाना’चे आयोजन केले पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यातील ‘सीसीटीव्ही’, ‘फोटोकॉपियर’, संगणक, भ्रमणसंगणक, दूरध्वनी संच आदी चालू स्थितीत असले पाहिजे. यातील कोणतीही वस्तू बिघडलेली असल्यास ती तात्काळ दुरुस्त केली पाहिजे. मला मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट येथील पोलीस ठाण्याचा नंबर गेली कित्येक मास चालत नाही. कायद्यासंबंधी जुनी पुस्तके काढून टाकून त्या ठिकाणी नवीन पुस्तके आणून ठेवली पाहिजेत. नवीन कायद्यांविषयी माहिती असलेली पुस्तके ठाण्यामध्ये ठेवली पाहिजेत. पोलिसांच्या वाहनांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक शुक्रवारी वाहनांची ‘जी.आर्.पी.’ मैदानात ‘परेड’चे आयोजन करून वाहने तंदुरुस्त आहेत का ? हे पाहिले पाहिजे. या वेळी ‘आठवड्यातील चांगला चालक’ निवडला पाहिजे. पोलीस ठाण्यातील ‘लॉग बुक’ प्रतिदिन भरले गेले पाहिजे. अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांची क्षमता ‘किती अमली पदार्थ कह्यात घेतले’ यावरून नव्हे, तर पोलिसांनी अमली पदार्थाच्या विरोधात किती कृती केल्या ?’, यावरून ठरवली जाणार आहे.’’