Indian Basmati Rice : भारतीय बासमती तांदूळ जगातील सर्वोत्कृष्ट तांदुळांच्या सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर !

नवी देहली – जगातील सर्वोत्तम ६ तांदुळांच्या सूचीमध्ये भारताच्या बासमती तांदुळाला पहिले स्थान मिळाले आहे.  पारंपरिक खाद्यपदार्थ, पाककृती आणि संशोधन यांचा आढावा घेणार्‍या ‘टेस्ट अ‍ॅटलस’ या संस्थेने ही सूची बनवली आहे. भारतात उत्पादित होणारा बासमती तांदूळ हा उच्च दर्जाचा सुगंधी तांदूळ आहे, ज्याला जगभरात मोठी मागणी आहे. या सूचीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर इटलीचा ‘अरबोरियो’ तांदूळ असून पोर्तुगालचा ‘कॅरोलिनो’ तांदूळ तिसर्‍या क्रमांकावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

१. ‘टेस्ट अ‍ॅटलस’ने बासमती तांदुळाविषयी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘बासमती’ हा मूलतः भारत आणि पाकिस्तान या देशांत लागवड केला जाणारा  लांब आकाराच्या तांदुळाचा प्रकार आहे. या तांदुळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे. शिजल्यावर याचे दाणे वेगळे रहातात.

२. तांदूळ निर्यातीत भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी २३ लाख टन तांदूळ निर्यात केला आहे, जो जागतिक बाजारपेठेतील एकूण तांदुळाच्या ४०.८ टक्के आहे. जगभरात भारत ६५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो, तर पाकिस्तान ३५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो.