‘लव्ह जिहाद’पासून आया-बहिणींना वाचवण्याचा संकल्प करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

२४ ते २८ जानेवारी दुर्ग श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड येथे धारातीर्थ यात्रा

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

डोंबिवली, १५ जानेवारी (वार्ता.) – हिंदूंसाठी जिहादी धर्मांध हे सर्वांत मोठे शत्रू आहेत. त्यांच्याकडून हिंदूंना सर्वाधिक धोका आहे. ‘लव्ह जिहाद’ हाही एक मोठा धोका आहे. त्या धोक्याची आजही अनेकांना जाणीव नाही. त्यामुळे आपल्या आया-बहिणी त्याला भुलतात आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी या ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या आया-बहिणींना वाचवण्यासाठी संकल्प केला पाहिजे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. डोंबिवली येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित शिवचरित्र व्याख्यानमालेत शेकडो धारकरी उपस्थित होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘गड-दुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढील पिढ्यांना दिलेला एक मोठा वारसा आहे; मात्र दुर्दैवाने आजचे लोकप्रतिनिधी, सरकार हे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धन यांसाठी विशेष लक्ष देतांना दिसत नाही. शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि सामर्थ्य याची माहिती अधिकाधिक तरुणांना झाली पाहिजे. या व्यापक हेतूने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने राज्यभरातील विविध गडांवर मोहिमांचे नियोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २४ ते २८ जानेवारी या कालावधीत दुर्ग श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड येथे धारातीर्थ यात्रेचे (मोहीम) आयोजन करण्यात आले आहे. यात सहस्रोंच्या संख्येने सहभागी व्हावे.’’

या वेळी पू. भिडेगुरुजींनी रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील मंत्रमुग्ध करणार्‍या विविध प्रसंगांचे दाखले दिले. नियोजित गडकोट मोहीम (धारातीर्थ यात्रा) आणि पुढील उपक्रम यांविषयीची माहितीही त्यांनी या वेळी दिली.