Conspiracy Pannu Murder Issue : निखिल गुप्ता यांच्या विरोधात पुरावे देण्यास अमेरिकेचा नकार

गुरपतवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येच्या कटाच्या प्रकरणी आहेत अटकेत !

गुरपतवंत सिंह पन्नू आणि निखिल गुप्ता

वॉशिंग्टन (अमेरिका) : ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येचा कट रचल्याच्या अमेरिकेच्या आरोपावरून युरोपमधील चेक रिपब्लिक देशात भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांना अटक करण्यात आली होती. गुप्ता यांना अद्याप अमेरिकेच्या कह्यात देण्यात आलेले नाही. पन्नू याच्या हत्येच्या कटाच्या आरोपाच्या संदर्भात अमेरिकेकडून अद्याप कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. अमेरिकेच्या सरकारने गुप्ता यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यास नकार दिला आहे. ‘गुप्ता यांना चेक प्रजासत्ताक येथून अमेरिकेत आणल्यानंतरच निखिल गुप्ताविरुद्ध न्यूयॉर्क न्यायालयात पुरावे देऊ’, असे अमेरिकी सरकारने म्हटले आहे. निखिल गुप्ता यांचे अधिवक्ता त्यांना अमेरिकेला नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

(सौजन्य : The Indian Express)

परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले होते की, भारताला गुप्ता यांचा ३ वेळा ‘कॉन्सुलर ऍक्सेस’ (बंदीवान ज्या देशाचा आहे, त्या देशाचे मुत्सद्दी किंवा अधिकारी कारागृहात जाऊन बंदीवानाला भेटण्याची अनुमती) मिळाला आहे.

निखिल गुप्ता यांना बलपूर्वक खाण्यास दिले जात आहे डुक्कर आणि गोमांस !

मागील मासामध्ये निखिल गुप्ता यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. निखिल गुप्ता यांना प्राग (चेक प्रजासत्ताक) येथील कारागृहात बेकायदेशीरपणे डांबण्यात आले आहे. हिंदु प्रथांच्या विरोधात असूनही त्यांना बलपूर्वक डुक्कर आणि गाय यांचे मांस खायला दिले गेले. कारागृह अधिकार्‍यांना सांगूनही त्यांना शाकाहारी जेवण मिळाले नाही.

संपादकीय भूमिका

कॅनडा आणि अमेरिका हे एकाच माळेचे मणी आहेत. दोघेही खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतालाच आरोपी म्हणून दाखवत आहेत. या दोघांना भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले पाहिजे !