Plastic Particles Drinking Water : १ लिटरच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये असतात १ ते ४ लाखापर्यंतचे प्लास्टिकचे सूक्ष्म कण !

  • संशोधनाचा निष्कर्ष !

  • ‘वॉटर फिल्टर्स’मधूनही मिसळतात प्लास्टिकचे कण !

धक्कादायक ! तुमच्या बाटलीबंद पाण्यात लाखो अदृश्य प्लास्टिकचे कण असू शकतात !!!

नवी देहली : अमेरिकेतील कोलंबिया विश्‍वविद्यालय आणि रटजर्स विश्‍वविद्यालय यांच्या संशोधकांच्या ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात पूर्णपणे बंद पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीतील सरासरी एका लिटर पाण्यात अनुमाने १ ते ४ लाख ‘नॅनोप्लास्टिक’चे सूक्ष्म कण असतात, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

हे सूक्ष्म कण आरोग्यासाठी घातक आहेत का ? याविषयी संशोधन चालू आहे. रटगर्स विश्‍वविद्यालयाचे विषशास्त्रज्ञ आणि या संशोधनाच्या अभ्यासाचे सह-लेखक फोबी स्टॅपलटन यांनी सांगितले की, हे कण मानवासह अन्य सस्तन प्राण्यांच्या शरिरामध्ये गेल्यावर त्याचा पेशींवर नेमका काय आणि किती प्रमाणात प्रभाव पडतो ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

(सौजन्य : KTLA5)

या संशोधनासाठी नवीन विकसित ‘लेझर’ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता, ज्या माध्यमातून अगदी लहान तुकड्यांचा शोध घेणे शक्य झाले. सूक्ष्म कण मुख्यतः प्लास्टिकच्या बाटलीमधूनच पाण्यात मिसळत होते. याखेरीज पाणी फिल्टर करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या फिल्टरचेच प्लास्टिकही पाण्यात मिसळत असल्याचे या संशोधनात निदर्शनास आले.