मालदीवची आर्थिक कोंडी, भारताची कणखर परराष्ट्रनीती आणि भारतियांचे राष्ट्रप्रेम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  २ कारणांमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या पुढाकारामुळे अयोध्या येथे साकारले जाणारे भव्य राममंदिर आणि दुसरे म्हणजे नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यावर निर्माण झालेला वादंग ! या लेखात दुसर्‍या घटनेच्या अनुषंगाने लक्षद्वीपविषयी पंतप्रधानांची असणारी दूरदृष्टी, भारतियांचे कर्तव्य आणि विश्वातील भारताचे महत्त्व यांविषयीची सूत्रे आपण पहाणार आहोत.

लक्षद्वीपच्या निसर्गसौंदर्याकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तेथील समुद्रकिनारी प्रसारित केलेले त्यांचे छायाचित्र

१. मालदीवची जिरली, नव्हे जिरवली !

पंतप्रधान मोदी हे पर्यटनाच्या हेतूने लक्षद्वीपला गेले होते. तेथील त्यांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यानंतर मोदींनी पर्यटनासाठी सौंदर्यपूर्ण लक्षद्वीपचा पर्याय भारतियांना दिला. पंतप्रधानांचा आदर्श घेत अनेक भारतियांनी मालदीवचे पर्यटनासाठी केलेले आरक्षण पटापट रहित करत लक्षद्वीपला जाण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी ‘मेक माय ट्रिप’, ‘इज माय ट्रिप’ अशा विविध पर्यटन करणार्‍या आस्थापनांकडून मालदीवची तिकिटे रहित केली. इतके दिवस पर्यटनाच्या नावाखाली अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारणार्‍या मालदीवला भविष्यातील आर्थिक संकटाची चिंता सतावू लागली. त्यामुळे मालदीवने पंतप्रधानांच्या विरोधात भाष्य केले, तसेच लक्षद्वीपवरही टीका केली. मग झाले काय ! सर्व भारतीय मालदीवला विरोध करण्यासाठी एकवटले. त्यांनी मालदीववर बहिष्कार घातला. सामाजिक माध्यमांवर सर्वत्र ‘बॉयकॉट मालदीव’, तसेच ‘चलो लक्षद्वीप’ असा ‘ट्रेंड’ (समाजमाध्यमांवरील चर्चा) मोठ्या प्रमाणात चालू झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, खेळाडू, उद्योगपती, क्रिकेटपटू यांनीही मालदीववर बहिष्कार घालण्याचे मोठ्या प्रमाणात आवाहन केले. यामुळे मालदीवची अर्थचक्रे उलट फिरू लागली. मालदीवला आर्थिक घरघर लागली; कारण मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असून त्यात भारतियांचा वाटा सर्वाधिक आहे.

सरतेशेवटी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणार्‍या ३ मंत्र्यांचे त्यागपत्र घेतले. मरिअम शुआन, मालसा आणि हसन जिहाद अशी त्या मंत्र्यांची नावे आहेत. मालदीवची खोड चांगलीच जिरली ! भारताचा मित्र असणार्‍या इस्रायलने लक्षद्वीप बेटांच्या ठिकाणी ‘डिसेलिनेशसन (डिसेलिनेशसन, म्हणजे समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून पिण्याचे पाणी सिद्ध करणे) तंत्रज्ञान’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच तेथील सौंदर्याचे विशेष वर्णनही केले. थोडक्यात काय, तर इस्रायलनेही मालदीववर एक प्रकारे निशाणा साधून त्याला त्याची जागा दाखवली. मालदीवमधील राजकीय नेत्यांना परिस्थितीची कल्पना आल्याने तेही आता राष्ट्राध्यक्ष महंमद मोईज्जु यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या सिद्धतेत आहेत. ‘भारताच्या विरोधात गेलो की, काय भोगावे लागते’, हे मालदीवच्या चांगलेच लक्षात आले असेल ! ‘मालदीव असोशिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री’नेही आता सारवासारव करत म्हटले, ‘‘आमच्याकडून पंतप्रधान मोदी आणि भारतीय यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. भारत हा आमचा मित्र देश आहे. तो संकटांत नेहमीच उभा रहिला आहे.’’ अर्थात् नंतर सारवासारव करून काय उपयोग ? मालदीवचे पितळ जगासमोर उघडे पडलेच !

२. अर्थव्यवस्थेला गालबोट !

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०२३ पर्यंत सुमारे २ लाख ९ सहस्र १९८ भारतीय पर्यटक मालदीव येथे आले. वर्ष २०२२ मध्ये २ लाख ४१ सहस्र भारतियांनी मालदीवला भेट दिली, तर वर्ष २०२१ मध्ये २ लाख ९१ सहस्र आणि २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात ६३ सहस्र भारतीय मालदीव येथे जाऊन आले. यातूनच मालदीव पर्यटनाच्या पर्यायाने आर्थिक दृष्टीने भारतावर किती अवलंबून आहे, हे लक्षात येते. आता तर सहस्रावधी भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार घातला आहे. भारतियांच्या राष्ट्रप्रेमाची चुणूक ही यानिमित्ताने पहायला मिळत आहे. त्यामुळे मालदीव पर्यटनाला उतरती कळा लागण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत या बेटावर सुमारे २ लाख पर्यटक जाणार नसल्याचेही म्हटले जात आहे. वर्ष २०२१ च्या आकडेवारीनुसार भारत मालदीवचा तिसरा सर्वांत मोठा व्यापार भागीदार आहे. भारतातून मालदीवला पुष्कळ गोष्टींची निर्यात केली जाते.

३. भारतियांच्या राष्ट्रप्रेमाची चुणूक आणि मोदींचे श्रेय !

सौ. नम्रता दिवेकर

भारतात काँग्रेस सरकार ६० वर्षे सत्तेत असूनही त्यांना भारतियांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करता न आल्याने भारतीयही षंढ मानसिकतेत वावरत होते. नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच विविध माध्यमांतून टप्प्याटप्प्याने भारतियांमध्ये हा राष्ट्राभिमान रुजवला अन् जागृत केला. त्यामुळे आता तोच कार्य करत आहे. देशाला विकासाच्या मार्गावर नेण्ो, तसेच संपूर्ण विश्वात आज भारताचा डंका वाजणे, हे साध्य करण्याचे श्रेय मोदींना जाते. जे आतापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना जमले नाही, ते मोदींनी अल्पावधीत सहज साध्य केले आणि करतही आहेत. ते भारताला सर्व स्तरांवरील नागरिकांच्या साहाय्याने अत्युच्च शिखरावर नेण्याचे महत्ध्येय साध्य करत आहेत. प्रसंगावधान राखत ते त्यांचा हुकमी एक्का वापरतात आणि देशासाठी लाभदायक वातावरण निर्माण करतात. मोदी यांच्यातील दूरदर्शीपणा वाखाणण्याजोगा आहे. भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी अखंड धडपडणारा, श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठीचा जागर देशभरात निर्माण करणारा, विश्वातील शत्रूराष्ट्रांच्या संदर्भात ‘जशास तसे’ भूमिका घेत मित्रराष्ट्रांना सदोदित साहाय्याचा हात देणारा पंतप्रधान भारताला लाभणे, हे भारतियांना अभिमानास्पद म्हणावे लागेल.

४. मालदीवला शहाणपण येईल का ?

मालदीवच्या प्रकरणानंतर भारताचे नाव जगभरात चर्चिले जाऊ लागल्यावर चीनला पोटशूळ उठणारच ! त्याच्या नाकाला मिरच्या झोंबणारच ! मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू हे सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी मालदीवचे समर्थन केले असून भारताच्या विरोधात वक्तव्ये केली अन् स्वतःचे शत्रूत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. चीनकडून अनेक लहान राष्ट्रांमध्ये भारतद्वेषी बीजे पेरली गेली आहेत. चीनने त्यांना अर्थसाहाय्य करून कर्जाच्या जाळ्यात ओढले. मालदीव हे लहान राष्ट्र असल्याने बलाढ्य चीनचे कर्ज त्यांना काही फेडता आले नाही. भारताने साहाय्याचा हात दिला; पण चीनने पसरवलेल्या भारतद्वेषामुळे त्यांनी तो थेट नाकारला. आता ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या डबघाईला येण्याच्या मार्गावर आहेत. मालदीवचेही तसेच झाले. भारताच्या कुरापती काढणार्‍या चीनधार्जिण्या मालदीवलाही धडा शिकवणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे लक्षद्वीपच्या पर्यटनाच्या माध्यमातून दूरदृष्टी असणार्‍या मोदींना जे साध्य करायचे होते, ते साध्य झालेच; पण आता मालदीव शहाणपणाने वागेल का ? त्याने स्वतःची ताठर भूमिका झिडकारली, तरच त्याचा काहीतरी निभाव लागेल, अन्यथा दिवाळखोरीचा उंबरठा त्यालाही गाठावाच लागेल !

५. भारतियांनो, कर्तव्यभान ठेवा !

मालदीवच्या प्रकारानंतर अनेक भारतियांनी सामाजिक संकेतस्थळांवर त्यांचे अभिप्राय नोंदवले. त्यांतील वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय असे – ‘भारताशी पंगा घेतला की, काय होते, याचा प्रत्यय मालदीवला आला !’, ‘मोदी ब्रँडची शक्ती लक्षात घ्या !’, ‘भारताने मालदीवला धडा शिकवला !’, ‘होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !’, ‘भारतीय पर्यटनाला न्याय मिळाला !’ इत्यादी.

भारताने जरी छोट्याशा मालदीवला नमवले असले, तरी या प्रकारातून संपूर्ण विश्वभरात भारताच्या सामर्थ्याची चुणूक दिसली, हे निश्चित ! यातून ‘भारत विश्वगुरु होणार’, हेही सर्वांना ज्ञात झाले असणार. भारतीय एकवटले की, काहीही होऊ शकते आणि काहीही घडू शकते, याची कल्पना या उदाहरणातून आली. त्यामुळे अन्य शत्रू देश आता भारताविषयी सावधगिरीची पावले उचलतील. भारतियांनीही आता या प्रकारानंतर पुन्हा हातावर हात ठेवून गप्प न बसता राष्ट्रोत्कर्षासाठी अहोरात्र झटले पाहिजे. लक्षद्वीपसारख्या पर्यटनस्थळांना आपणच महत्त्व द्यायला हवे. प्रत्येक वेळी पंतप्रधानांनी आवाहन करायचे आणि मग भारतियांनी कार्यरत व्हायचे, यापेक्षा स्वतःतील देशाभिमान जागृत ठेवून भारतीयत्वाचे कर्तव्य पार पाडायला हवे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१.२०२४)


मालदीवमधून जिहाद्यांची ‘इसिस’ या जिहादी संघटनेत झाली भरती !

मालदीव हा केवळ ‘टुरिझम’चा (पर्यटनाचा) नव्हे, तर ‘टेररिझम’चाही (आतंकवादाचा) ‘हॉटस्पॉट’ (महत्त्वपूर्ण जागा) ठरत आहे. ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेत मालदीवमधूनच जिहाद्यांची भरती झाली आहे. मालदीवची लोकसंख्या साडेपाच लाख असून या देशात अनुमाने १ सहस्र ४०० आतंकवादी सक्रीय आहेत.

मालदीव हा सुन्नीबहुल देश आहे. ‘हा देश अतिशय कट्टरतावादी असून आतंकवाद्यांच्या विरोधात त्याची भूमिका मवाळ रहाते’, असे अमेरिकेनेही म्हटले आहे. कधीकाळी बौद्ध धर्मीय असलेला मालदीव वेगाने इस्लामी देश झाला. मुसलमानेतरांना तेथे नागरिकत्वही दिले जात नाही. ‘मालदीव देश इतका कट्टर आहे की, तेथे मुसलमानेतरांना धर्माचरणाची अनुमती दिली जात नाही. ते सार्वजनिकरीत्या पूजापाठ करू शकत नाहीत’, असा उल्लेख अमेरिकन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वर्ष २०२२ मधील अहवालात करण्यात आला आहे. देवतांच्या मूर्ती स्थापित केल्याच्या आरोपाखाली मालदीवमध्ये ३ भारतीय पर्यटकांना अटक करण्यात आली होती. मालदीवमध्ये जवळपास २९ सहस्र भारतीय रहातात; पण त्यांना इस्लाम स्वीकारावा किंवा स्वतःचा धर्म लपवावा लागतो.


मालदीवचा इतिहास

मालदीव हे भारत आणि श्रीलंका यांच्या जवळ वसलेले बेट आहे. इतिहासानुसार मालदीव २ सहस्र ५०० वर्षांहून अधिक जुना आहे. येथे प्रारंभीचे रहिवासी हे गुजराती असल्याचे मानले जाते. मालदीववर १२ व्या शतकापर्यंत हिंदु राजांचे राज्य होते. यानंतर ते बौद्ध धर्माचेही केंद्र बनले. तमिळ चोला राजांनीही येथे राज्य केल्याचे सांगितले जाते; पण अरब व्यापार्‍यांच्या आगमनानंतर त्याचे हळूहळू इस्लामी राष्ट्रात रूपांतर झाले. आता मालदीवमध्ये इस्लामचे राज्य आहे. मालदीवचा शेवटचा बौद्ध राजा धोवेमी यानेही इस्लाम स्वीकारला होता. २६ जुलै १९६५ या दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मालदीव स्वतंत्र झाले. मालदीवचे इस्लामीकरण तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मौमून गयूम यांच्या कारकीर्दीत झाले. त्यांनी वर्ष १९७८ ते २००८ या कालावधीत एका हुकूमशाहसारखे राज्य केले. गयूम यांच्या कार्यकाळात ‘धार्मिक एकता संरक्षण अधिनियम १९९४’ या कायद्याद्वारे घटनादुरुस्ती करून त्यांनी सुन्नी इस्लामी राज्य स्थापित केले. आता मालदीवमध्ये सुन्नी मुसलमानांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. वर्ष २०१३ मध्ये राष्ट्राध्यक्ष झालेल्या यमीन आणि त्यांच्या पक्षाने देशात धार्मिक कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले. त्यानंतर अनेक तरुण सीरियात जाऊन ‘इसिस’मध्ये सामील झाले आहेत.

– सौ. नम्रता दिवेकर (९.१.२०२४)