जगात नास्तिक आणि परमार्थ-विमुख कुणी नाही !

विठ्ठल-रखुमाई

‘भौतिकशास्त्रे ही मनुष्याच्या इहलोकाच्या सुखाचा विचार करतात; पण धर्मशास्त्र हे मानवाच्या इहलोकाच्या सुखासह परलोकाच्या सुखाचाही विचार करते. ‘यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः ।’ (वैशेषिक दर्शन, अध्याय १, आह्निक १, सूत्र ३), म्हणजे ‘ज्या योगाने आपला अभ्युदय होऊन आपल्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होते, तो धर्म होय’, अशी धर्माची व्याख्याच मुळी आमच्या शास्त्राकारांनी केलेली आहे. देव न मानणार्‍या कुणाही नास्तिक मनुष्याला विचारले, तर तो ‘मला सुख पाहिजे; पण दु:ख नको’, असेच सांगेल आणि ‘हे सुखसुद्धा दु:खमिश्रित नसावे, विटणारे नसून अवीट अन् ते चिरकाल टिकणारे असावे’, असेच म्हणेल. असे दु:ख क्लेशरहित सुख अथवा ‘निर्दु:खानंद, निरतिशयानंद’ यालाच आमचे शास्त्रकार ‘देव’ अथवा ‘परमेश्वर’ म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे ‘सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।’

म्हणजे ‘विठ्ठल-रखुमाई हेच सर्व भक्तांसाठी सुखाचे आगर आहेत’, हे वचन प्रसिद्धच आहे.

सारांश : परमेश्वरप्राप्ती हे प्रत्येक जीवाचे ध्येय ठरते आणि हे ध्येय साधण्याच्या प्रयत्नाला ‘परमार्थ’ म्हणतात. त्या अर्थी परमार्थही प्रत्येक मनुष्याला हवा आहे, हे सिद्ध होते.’

– श्री. रामचंद्र कामत संपादित ‘नाम चिंतामणी’

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१)