सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि लेखक विवेक मेहेत्रे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. विवेक मेहेत्रे यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना डॉ. रूपाली भाटकार

रामनाथी (गोवा) – मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि लेखक श्री. विवेक मेहेत्रे यांनी ५ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म कार्य यांविषयीची माहिती आस्थेने जाणून घेतली. सनातनच्या साधिका डॉ. रूपाली भाटकार यांनी त्यांना आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.

या वेळी श्री. मेहेत्रे यांनी आश्रमाविषयी अभिप्राय देतांना सांगितले, ‘‘आश्रमातील स्वच्छता, टापटीपपणा आणि साधकांचा सेवाभाव पाहून मी थक्क तर झालोच, पण नतमस्तकही झालो. साधकांमधील नम्रता, नियोजन, शिस्तबद्धता आणि सात्त्विक आहार या सर्वांचा प्रभाव माझ्यावर झाला आहे. व्यवस्थापन शास्त्रातील सर्व नियम अलिखितपणे आणि सहजपणे पाळले जातात, याचे मला पुष्कळ कौतुक वाटले. सनातन आश्रमाविषयी मी अनेक वर्षांपासून ऐकून होतो, पण ते जवळून पहाण्याचे, त्या वातावरणात रहाण्याचे आणि येथील आत्मिक शक्ती आणि स्पंदने अनुभवण्याचे भाग्य मला माझ्या वास्तव्यामध्ये लाभले, याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. हा अनुभव अन्यांनीही घ्यावा, अशी शिफारसही मी या प्रसंगी करू इच्छितो.’’

श्री. विवेक मेहेत्रे यांचा परिचय

श्री. विवेक मेहेत्रे हे सुप्रसिद्ध ‘मोटिव्हेशन ट्रेनर’, व्यंगचित्रकार, संपादक, लेखक, प्रकाशक आणि प्रभावी वक्ते आहेत. त्यांची संगणक आणि इंटरनेट या विषयांवरील मराठी, गुजराती आणि इंग्रजी यांतील यापूर्वीची सर्व पुस्तके लोकप्रिय अन् पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. सोप्या पण सिद्धहस्त भाषाशैलीचा, चित्रकलेचा आणि आकर्षक मांडणीचा अनोखा संगम त्यांच्या प्रत्येक पुस्तकात पहायला मिळतो. अनेक प्रसिद्ध नियतकालिकांमध्ये त्यांचे संगणकविषयक आणि अन्य विषयांवरील लिखाण प्रसिद्ध झाले आहे.