पणजी (पत्रक) – राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव यांचे डोके फिरले आहे. त्यांची तब्येत कधी कधी अशी बिघडते की, ते काय बोलतात, तेच त्यांना समजत नाही. यांना उपचारांची आवश्यकता आहे, अशी टीका राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली आहे. २ दिवसांपूर्वी चर्चिल आलेमाव यांनी ‘गोव्यात पोर्तुगिजांमुळे ८० टक्के विकास झाला. त्यांच्यामुळेच गोमंतकियांना विदेशात नोकरी करता आली’, असे वक्तव्य केले होते.
फळदेसाई यांनी पुढे ‘स्वातंत्र्यदिनी आलेमाव भारताच्या राष्ट्रध्वजाला सलाम करण्याऐवजी गोव्यात पोर्तुगिजांमुळे विकास झाला; म्हणून पोर्तुगिजांना सलाम करत होते. मग तुम्ही आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री कशाला झाला ? तुम्ही राजकारणात काय करता ? तुम्ही त्यागपत्र द्या आणि पोर्तुगालला जाऊन रहा’, असा सल्ला दिला आहे. ‘गोव्यातील जी ८० टक्के जनता पोर्तुगीज पारपत्रामुळे जगते त्यांनाही पोर्तुगालला घेऊन जा, म्हणजे आहे ती २० टक्के जनता गोव्यात समाधानाने जगेल’, असेही फळदेसाई म्हणाले.
गोमंतकियांना २ पारपत्रे देण्याविषयी आलेमाव म्हणाले होते की, गोमंतकियांना दोन्ही पारपत्रे ठेवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. यापूर्वी गोवा मुक्तीदिनाच्या दिवशी ‘पोर्तुगिजांनी जातांना वर्ष १९६२ पूर्वी जन्मलेल्या गोमंतकियांना पोतुगीज नागरिकत्व मिळण्याची दारे खुली केली’, असेही आलेमाव म्हणाले होते.