परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवून धर्मप्रचाराची समष्टी सेवा करून घेतल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होणे

आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३१ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे चुका टळून सेवेची फलनिष्पत्ती वाढल्यामुळे साधनेत प्रगती झाली’, याविषयी वाचले. आज ‘समष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबल्यामुळे समष्टी सेवा केली आणि त्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती कशी झाली ?’, याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत. (भाग ४)

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घरोघरी जाऊन अध्यात्मप्रचार करण्यास सांगितल्यावर ‘समाजाला धर्मशिक्षणाची पुष्कळ आवश्यकता आहे’, हे लक्षात येणे

‘घरोघरी धर्मप्रचाराला गेल्यामुळे ‘लोकांमध्ये धर्म आणि साधना यांच्याविषयी प्रचंड अज्ञान आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१ अ. देवघराच्या मांडणीविषयी अज्ञान असणे : देवाधर्माचे (धार्मिक कृती) करणारे बरेच जण भेटले; परंतु त्या ‘धार्मिक कृतींमागे धर्मशास्त्र काय आहे ?’ किंवा ‘धार्मिक कृती योग्य प्रकारे कशा करायला पाहिजेत ?’, हे बहुतेक हिंदूंना ठाऊक नाही, उदा. प्रत्येकाच्या घरात देवघर होते; परंतु ‘देवघरात कुठले देव असावेत ?’, ‘देवघरात देवतांची रचना कशी असावी ?’,  किंवा ‘उपवासाचे महत्त्व काय आहे ?’, यांमागील धर्मशास्त्र कुणालाही ठाऊक नव्हते.

१ आ. ‘कुठल्या देवतेची उपासना आवश्यक आहे ?’, याविषयी अज्ञान असणे : बहुतेक जण स्वतःच्या आवडीच्या देवतेची भक्ती करतो; परंतु ‘धर्मशास्त्रानुसार कुठल्या देवतेची उपासना करायला पाहिजे ?’, याविषयी हिंदूंमध्ये अज्ञान दिसून आले.

१ इ. प्रतिदिन करायच्या धार्मिक कृतींमागील शास्त्र ठाऊक नसणे : हिंदूंना ‘धर्माचरण म्हणजे काय ?’, याचेच ज्ञान नाही. ‘नमस्कार कसा करावा ?’, ‘कपाळावर कुंकू का लावावे ?’ यांसारख्या प्रतिदिन करायच्या धार्मिक गोष्टींविषयीही हिंदूंमध्ये पराकोटीचे अज्ञान आहे.

१ ई. मनाने साधना करणे : प्रत्येक हिंदूला ‘मी योग्य साधना करत आहे’, असे वाटते आणि तो अध्यात्मातील सर्व कृती मनानेच करतो.

१ उ. जीवनातील साधनेचे महत्त्वच ज्ञात नसणे : बहुतेक कुटुंबात अडचणी होत्या आणि त्यांच्यामध्ये अस्वस्थता अन् ताण जाणवत होता; पण ‘त्यावर उपाय म्हणून साधना करायला हवी’, असे कुणालाही ज्ञात नव्हते. शेकडो नव्हे, तर सहस्राेंमध्ये एकालाही जीवनातील साधनेचे महत्त्व ठाऊक नव्हते.

१ ऊ. हिंदु धर्माविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा नसणे : ‘साधनेतही पुढचा पुढचा टप्पा असतो’, हे ठाऊक नसल्यामुळे ‘या टप्प्यातून पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजेत’, हेच हिंदूंना ज्ञात नाही. त्यामुळे देवपूजा करणारी व्यक्ती वर्षांनुवर्षे केवळ देवपूजाच करत रहाते. हिंदूंमध्ये अनंताचे ज्ञान असलेल्या आपल्या हिंदु धर्माविषयी जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती अत्यल्प आहे.

१ ए. सुख आणि आनंद यांतील भेद न कळणे : लोकांना ‘खरा आनंद म्हणजे काय ?’, हे ठाऊकच नाही. ‘आनंद हा शाश्वत टिकणारा असतो, तर सुख हे क्षणिक किंवा काही काळापुरतेच टिकते आणि ‘शाश्वत आनंद केवळ साधनेनेच मिळतो’, हे समाजाला ठाऊक नसल्यामुळे समाज साधना करत नाही. त्यामुळे समाजाकडून आनंदप्राप्तीसाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.

२. धर्मप्रसार करण्याची तळमळ वाढणे

वर सांगितल्याप्रमाणे समाजाची स्थिती असल्यामुळे प.पू. डॉक्टर ‘आपल्याला घरोघरी जाऊन धर्मशिक्षण द्यायला हवे’, असे का म्हणतात ?’, हे माझ्या लक्षात आले. समाजाचे धर्माविषयीचे अज्ञान माझ्या लक्षात आल्यावर माझ्यामध्ये धर्मप्रसार करण्याची तळमळ वाढली.

३. काळानुसार समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मनावर बिंबवणे

प.पू. डॉक्टर नेहमी साधकांना सांगायचे, ‘‘काळानुसार व्यष्टी (व्यक्तीगत) साधनेला ३५ टक्के महत्त्व आहे आणि समष्टी साधनेला (‘समाजात धर्मप्रसार करून समाजाला साधना करण्यास प्रवृत्त करणे’, याला) ६५ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे ‘जलद गतीने साधना होण्यासाठी व्यक्तीने व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करणे आवश्यक आहे’, हे माझ्या मनावर बिंबले गेले.

४. समष्टी साधना मनापासून केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होणे

प.पू. गुरुदेवांनी माझ्या मनावर समष्टी साधनेचे महत्त्व बिंबवल्यामुळे धर्मप्रसार करण्याची माझ्यातील तळमळ वाढत गेली. ‘या समष्टी साधनेमुळेच माझी आध्यात्मिक प्रगती शीघ्रतेने झाली’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञतेच्या भावाने त्यांच्या चरणी अर्पण !
(क्रमशः पुढच्या रविवारी)

इदं न मम ।’ (अर्थ : हे लिखाण माझे नाही.)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२१.७.२०२३)