कोटी कोटी प्रणाम !
आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी
१. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातील लिखाणाप्रमाणे करतो, तसे ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला प्रारंभ करावा.
२. परिसाला जसे लोखंड लागले की, त्याचे सोने होते, तसे नामाला आपले मन चिकटले की, आपल्या आयुष्याचे सोने नक्कीच होते.
३. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार ? याची काळजी करू नये, आज मात्र भगवंताचे ‘नाम’ घेत आनंदाने आपले कर्तव्य करावे.
४. नामात योगाची सर्व अंगे आहेत, हे लक्षात ठेवावे.
५. ‘जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेने घडते’, अशा भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान काय आहे, हे खात्रीने कळेल.
६. नामातच नामाचे प्रेम आहे. ताकात लोणी असतेच, ते वर दिसत नाही. ताक घुसळल्यावर जसे ते वर येते, तसे भगवंताचे नाम घेतले की, प्रेम आपोआपच वर येते.
७. आपला देह केव्हा जाईल, याचा नेम नाही; म्हणून ‘म्हातारा झाल्यावर नाम घेऊ’, असे म्हणू नये.
८. ‘मी सेवा करतो’, असे जो म्हणतो, त्याची खरी सेवा होतच नाही.
९. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करणे, म्हणजे भक्ती होय.
१०. भगवंताच्या भक्तीचा प्रारंभ त्याच्या गोड नामानेच होतो.
(साभार : ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ यांच्या संस्थेचे संकेतस्थळ)