पुणे – सार्वजनिक ठिकाणी (उघड्यावर), पदपथांवर अस्वच्छता करणार्या नागरिकांकडून दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या घनकचरा विभागाने सिद्ध केला आहे. सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, कचर्यांचे वर्गीकरण न करणे, अस्वच्छता करणे अशा करणांसाठी हा दंड करण्यात येतो. पूर्वी या दंडाची रक्कम १८० रुपये होती ती वाढवून आता ५०० रुपये करण्यात आली आहे. दंडाच्या रकमेमध्ये वाढ केल्याने असे प्रकार थांबतील, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
गेल्या वर्षभरामध्ये सार्वजनिक जागी थुंकणार्या १ सहस्र २४८ नागरिकांकडून १२ लाख ४८ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणार्या ८५८ नागरिकांकडून १ लाख ८१ सहस्र ६७० रुपये, कचरा जाळणार्या १ सहस्र २६३ नागरिकांकडून ७ लाख ९ सहस्र १०० रुपये असा दंड वसूल केला आहे. ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण न केल्याप्रकरणी २ सहस्र ६४ नागरिकांकडून ४ लाख ३ सहस्र रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या ३० सहस्र १२९ नागरिकांकडून ९५ लाख ६५ सहस्र रुपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. कचरा प्रक्रिया बंद असणार्या सोसायट्यांकडून २ लाख ७५ सहस्र रुपये, तर बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी २९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकात अस्वच्छता करणार्या आणि थुंकणार्या प्रवाशांना १०० रुपये दंड !
मुंबई – रेल्वे स्थानकात अस्वच्छता करणार्या आणि थुंकणार्या प्रवाशांना आता १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. येत्या आठवड्यापासून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये ३ मासांसाठी ‘रेल्वे क्लिन अप मार्शल’ची (स्वच्छता कामगारांची) नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य स्थानकांतही याचा विस्तार करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका :स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, हे प्रवाशांना सांगावे लागणे, तसेच त्यासाठी दंड लागू करणे म्हणजे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |