आध्यात्मिकतेने मानसिक बळ किती मिळते ?

अध्यात्म – ‘अधि+आत्म’, म्हणजे स्वतःकडे पहाणे. अर्थात्च स्वतःकडे पहाण्यात आत्मपरीक्षण येते. आत्मपरीक्षणातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय ? याचा विचार चालू होतो आणि मग एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होते. आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा त्यातील अनेक ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे, याची जाणीव निर्माण होते. आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय ? कार्य काय ? हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता !

१. अध्यात्म आणि धर्म यांतील भेद

अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. ‘मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव’, अशी शक्ती किंवा असे ‘कुणीतरी असते’, हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा मानत नाही. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो; पण पुष्कळ वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वर स्तुती, पूजा, प्रार्थना यांतून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले, तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात.

२. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिक दृष्टीकोनांचा मिळतो आधार !

अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरुपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवाद यांमध्ये सहभाग घेणे; जप, नामस्मरण यांतून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनःशक्ती वाढवणे, अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’चा शोध घेतला जातो. ही सगळी चर्चा करण्याचे कारण असे की, आजच्या संघर्षमय जीवनात मनःशांती मिळवणे अधिकाधिक आवश्यकतेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. जीवनातील आनंदच हरवून बसेल की काय ? अशी भीती वाटू लागते. कौटुंबिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक जीवन या सर्व आघाड्यांवर लढता लढता आबालवृद्ध थकून जातात. मनात निर्माण होणार्‍या चिंता, विषाद (दुःख), एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वांचा यशस्वीपणे सामना करतांना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीकोनांचा पुष्कळ लाभ होतो, हे आतापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून लक्षात आले आहे.

३. अध्यात्माकडे कल असलेली आणि नसलेली व्यक्ती यांच्यातील भेद

एखादे संकट आले की, परिस्थितीला दोष देत बसले की, मन निराश होते; पण ‘देवाला बहुधा या प्रसंगातून मला काहीतरी शिकवायचे आहे’ किंवा ‘देव जे करतो ते भल्याकरताच’, असे म्हणणार्‍या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही. अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात पालट होतात. अंतःस्राव करणार्‍या संस्था आणि प्रतिकारशक्ती यांमध्ये अनुकूल पालट घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून (शारीरिक आणि मानसिक) संरक्षण होते. वार्धक्यामध्ये येणार्‍या विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून सामना केला, तर उदासपणा न्यून होतो. ‘माझ्या कुठल्या तरी चुकीची किंवा पापाची मला शिक्षा मिळते आहे’ किंवा ‘माझे निरोगी असणे, हे माझ्या हातात नाही, तर काही दुष्ट शक्तींच्या हातात आहे’, असे मानणार्‍याला अधिक निराश वाटते. याउलट आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’, असे मानणारा अल्प निराश होतो.

४. आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होणे

कर्करोगासारख्या विकाराचा सामना करतांना किंवा हृदयरोग स्वीकारतांना वा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होतांना जी अतीचिंता निर्माण होते, ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या उपदेश-प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो, हे आपल्याकडच्या लातूर अन् कच्छ (गुजरात) येथे झालेल्या भूकंपानंतर अनुभवायला आले आहे. या प्रक्रियेत सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेतांना त्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरते आहे.

५. मानसिक उपचारांमध्येही आध्यात्मिकतेमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागणे

मानसिक उपचारांमध्येही आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे. मंदिर, तेथील वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण यांचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. आमच्या चिकित्सालयात येणार्‍या मंगलाताई नावाच्या रुग्ण प्रतिवर्षी वारीतून आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन कार्तिकी एकादशीपर्यंत तिथे रहायच्या अन् मानसिक बळ प्राप्त करून परत यायच्या. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतीरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो. स्वतःकडे ‘पहाण्यासह’ लक्ष केंद्रित करता येते. वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते. अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते.

६. भजन, ईशस्तुती, प्रार्थना यांतून मनःशांती आणि समाधान मिळणे

आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कलाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते. प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याची, लीनता, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठ्याने उच्चारलेले मंत्रोच्चारण, एखादे ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यांतून अमाप मनःशांती आणि समाधान मिळते.

७. संतसाहित्य प्रपंचातून आध्यात्मिकतेचा अवलंब करण्याविषयीची शिकवण मिळणे

आपल्याकडे संतसाहित्य स्वतःचा प्रपंच करतांना आध्यात्मिकतेचा अवलंब कसा करायचा ? याची शिकवण देते. समर्थ रामदासस्वामींनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. स्वतःचे दुःख आणि चिंता न्यून करण्यासाठी स्वतः पलीकडचा व्यापक विचार करण्याचा सल्ला ते देतात. म्हणूनच ते म्हणतात,

मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।।

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली म्हणतात, ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले । अवघेची जाले देह ब्रह्म ।।’ अशा वेळेस येणारी अनुभूती स्वतःचा शोध घ्यायला लावणारी असते. अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरते.

– डॉ. जान्हवी केदारे, मनोविकारतज्ञ

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ)