Spying For Israel : इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तुर्कीयेने ३३ संशयितांना घेतले कह्यात !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन

इस्तंबुल – हमास आणि इस्रायल यांच्यात २ महिन्यांहून अधिक काळ युद्ध चालू आहे. या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर इराण, लेबनॉन आणि तुर्कीये यांसह अनेक इस्लामी देश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात उघडपणे लढा देत आहेत. इस्रायल त्याचे लोक तुर्कीयेत पाठवून तेथे हेरगिरी करत असल्याचा तुर्कीयेचा आरोप आहे. इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तुर्कीयेच्या अधिकार्‍यांनी ३३ संशयितांना कह्यात घेतले आहे, तर इतर १३ जणांचा ते शोध घेत आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादशी या लोकांचा संबंध असल्याचा तुर्कीयेच्या अधिकार्‍यांचा दावा आहे.

१. काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख शिन बेट यांनी सांगितले होते की, त्यांची संस्था लेबनॉन, तुर्कीये आणि कतार यांसह अन्यत्रही कार्यरत असलेल्या हमासला नष्ट करण्यासाठी सिद्ध आहे.

२.  याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इस्रायलला चेतावणी दिली होती की, जर तुर्कीयेच्या भूमीवर हमासच्या सदस्यांवर आक्रमण केले, तर त्याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागतील.