सातारा, २९ डिसेंबर (वार्ता.) – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११० व्या पुण्यतिथी महोत्सवाला २७ डिसेंबर या दिवशी श्रींच्या पादुकांचे पूजन आणि प्रतिमेचे पूजन करून कोठी पूजनाने प्रारंभ झाला. महोत्सवाचा मुख्य दिवस ६ जानेवारी असून या दिवशी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाल आणि फुले उधळण्याचा कार्यक्रम होणार आहे. देवस्थान ट्रस्टने महोत्सवाची जय्यत सिद्धता केली असून संपूर्ण गोंदवले रामनाममय झाले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र गोंदवले येथील समाधी मंदिरात मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा ते कृष्ण दशमी या कालावधीत श्रींचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येतो. अक्षय बटवा आणि ब्रह्मानंद महाराज प्रतिमेचे पूजन करून स्वयंपाकघरातील चुलीचे पूजन करण्यात आले, तसेच गोशाळेतील गायींचे पूजन होऊन महोत्सवाला प्रारंभ झाला. महोत्सव कालावधीत अखंड रामनाम आणि खडा पहारा असणार आहे. मुख्य सभामंडपात नामवंत मान्यवरांची कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, गायन, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. संपूर्ण गावातून प्रतिदिन सकाळी १० वाजता श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.