मनोज जरांगे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चेतावणी !
छत्रपती संभाजीनगर – मुंबईच्या दिशेने जातांना आमची वाहने अडवल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरी जाऊन बसू, असे विधान मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. दुसरीकडे २९ डिसेंबर या दिवशी जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबई येथे आले आहे. त्यामुळे मुंबई येथे होणार्या मराठा आंदोलनाच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई येथे होणार्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पहाणी करण्यासाठी जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबई येथे आल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबई येथे घेऊन जावे लागणार आहे. त्यामुळे सर्व वाहने बाहेर काढावी लागणार आहेत. पोलिसांनी आमची वाहने अडवू नयेत. ज्यांना असे वाटत असेल की, आम्ही वाहने आणू नये त्यांनी आमच्या ३ वेळच्या जेवणाची सोय करावी.
ओबीसी जनमोर्चाने आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे अनुमती मागितली !विविध मागण्यांसाठी २० जानेवारी या दिवशी ओबीसी समाजाचे राज्यभर आंदोलन होणार आहे. त्यानुसार या दिवशी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे अनुमती मागितली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. मराठा समाजाची पायी मोर्चा २० जानेवारी या दिवशी सकाळी ९ वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघेल. त्यानंतर तो मजल दरमजल करत अहिल्यानगर – पुणेमार्गे मुंबई येथे पोचेल. |