Goa Poor Administration : सडये, शिवोली येथे तिलारीचे पाणी लोकांच्या घरात !

कालव्यांच्या दुरुस्ती-देखभालीविषयी शंका !

म्हापसा : २८ डिसेंबरला सकाळी शिवोली मतदारसंघातील सडये पंचायत क्षेत्रातील घरांत पाणी शिरले. रस्त्यावरूनही पाणी मोठ्या प्रमाणात वहात होते. या परिसरातील कालव्यांची स्वच्छता न केल्याने कालव्यात पाणी तुंबून राहून ते वरून वहात गावात शिरले. कालवे, धरणाचे दरवाजे यांच्या, तसेच धरणाच्या दुरुस्तीसाठी १३ नोव्हेंबर २०२३ पासून धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

(सौजन्य : Goan Reporter News)

गोव्याच्या सीमेपासून आत डावीकडच्या ४.५ कि.मी. लांबीच्या अस्नोडा आणि पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांना पाणी पुरवणारा मुख्य कालवा अन् उजवीकडील ५ कि.मी. लांबीच्या चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणारा कालवा यांच्या दुरुस्तीचे, तसेच इतर काम जलस्रोत खात्याने पूर्ण केले आहे, असे जलस्रोत खात्याने २७ डिसेंबरला जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. असे असतांना सडये, शिवोली येथे २८ डिसेंबरला पाणी रस्त्यावरून वहाणे, घरात शिरणे ही स्थिती जलस्रोत खात्याने केलेल्या कामांविषयी आणि कालव्यांच्या स्वच्छतेविषयी शंका उपस्थित करणारी ठरत आहे.