संपादकीय : वैदिक पुनरुत्थानाची ‘वेळ’ !

मुख्यमंत्री मोहन यादव

आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन  जीवनात ‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती’, ‘तुम्हाला काही काळ-वेळ आहे कि नाही ?’, ‘एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही’, हिंदीत ‘समय से पेहले और भाग्य से ज्यादा, किसी को कुछ नहीं मिलता’, तर इंग्रजीत ‘टाइम इज मनी’, अशा एक ना अनेक म्हणी आपल्या मनावर वेळेचे महत्त्व विविध भाषांत बिंबवत असतात. हीच वेळ काळगतीचे मोजमाप करणारीही आहे. प्राचीन भारताच्या वेळेच्या मापकाच्या आधारावर विदेशींनी  स्वतःची ‘ग्रीनविच मीन टाइम’ अर्थात् ‘जी.एम्.टी.’ पद्धत जगावर लादली. ही विदेशी ‘ग्रीनविच मीन टाइम’ पद्धत पालटून वेळेच्या संदर्भातील प्राचीन भारतीय पद्धत (महाकाल मीन टाइम) पुन्हा आणण्याची घोषणा मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नुकतीच केली. सध्या वेळ ठरवण्यासाठी जागतिक संदर्भ म्हणून वापरली जाणारी ‘प्राइम मेरिडियन’ (शून्य रेखांश) ही पद्धत इंग्लंडमधील ग्रीनविच येथून उज्जैन येथे आणून ‘महाकाल मीन टाइम’चे पुनरुत्थान करण्यासाठी यादव सरकारने कंबर कसली आहे. याद्वारे रात्री वेळ पालटण्याची विदेशी परंपरा संपुष्टात येईल आणि भारतीय प्रमाणवेळेचा अवलंब करून सूर्याेदयापासून वेळेची निश्चिती होईल. राष्ट्र आणि संस्कृती प्रेमींसाठी ही उत्साहवर्धक गोष्ट आहे.

अनेक धर्मशास्त्रीय आणि ऐतिहासिक सिद्धांतांनुसार प्राचीन काळी जगात उज्जैन हेच कालगणनेचे एकमेव केंद्र होते. भारताच्या मधोमध असल्याकारणाने उज्जैनला ‘नाभीप्रदेश’ किंवा ‘मणिपूरचक्र’ असेही म्हटले जाते. प्राचीन ‘सूर्य सिद्धांत’, ‘ब्रह्मस्फूट सिद्धांत’, ‘आर्यभट्ट’, ‘भास्कराचार्य’ यांच्यानुसारही उज्जैन हेच मधोमध वसलेले शहर आहे. स्कंदपुराणानुसार उज्जैन येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भगवान श्री महाकालेश्वर याला कालगणनेचे प्रवर्तक मानले जाते. उज्जैन हे प्राचीन भारतातील कालगणनेचा केंद्रबिंदू आहे. भगवान श्री महाकाल हे काळाचे आराध्य दैवत होत. भारतातील सुप्रसिद्ध राजा विक्रमादित्य याच्या कारकीर्दीत संपूर्ण भारताचा काळ उज्जैन येथून ठरवला गेला. ही वेळ सूर्योदय ते सूर्योदय, अशी निर्धारित करण्यात आली. पुढे भारतीय कालगणनेपासून प्रेरणा घेऊन ग्रीक, पर्शियन, अरबी आणि रोमन लोकांनी त्यांच्या ठिकाणच्या वेळा जाणून घेण्यासाठी स्वतःच्या वेधशाळा उभारल्या. याविषयी तज्ञांमध्ये बराच खल झाल्यावर कालांतराने ग्रीनविच हे शून्य रेखांशचे ठिकाण असण्याविषयी एकमत झाले. ‘शून्य रेखांश’ ही ग्रीनविच या लंडनच्या उपनगरातून जाते’, असे गृहीत धरण्यात आले. त्यानंतर आजतागायत आपल्यासह संपूर्ण जग इंग्लंडच्या ‘ग्रीनविच मीन टाइम’चे पालन करत आहे. पूर्वी उज्जैन येथून ही मानक वेळ मोजली जात होती. त्यामुळे हेच पालटून प्राचीन ‘महाकाल मीन टाइम’ पुन्हा लागू करण्याचा मानस मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या व्यापक महत्त्वाकांक्षेला केंद्र सरकारने कृतीशीलतेचे पाठबळ दिले पाहिजे. विमानशास्त्र काय, शून्याचा शोध काय किंवा कालगणना काय, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या भारताने जगाला दिलेली देणगी आहे. या सर्व गोष्टींवर आज विदेशी ‘आयत्या बिळावर नागोबा’ होऊन बसले आहेत. स्वातंत्र्यानंतर आपल्याला खरा इतिहास शिकवला गेला असता, तर पाश्चात्त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नसती. तथापि ‘सत्य कधीही लपून रहात नाही’, या सिद्धांतानुसार कालौघात प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरा यांचे महत्त्व जगाला आता पटत आहे; म्हणूनच ही खर्‍या अर्थाने वैदिक पुनरुत्थानाची ‘वेळ’ आहे.

प्राचीन आणि समृद्ध भारतीय परंपरेची माहिती मिळण्यासाठी भारतियांना खरा इतिहास शिकवणे आवश्यक !