पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय देयकांच्या संमतीसाठी लाच घेणार्‍या ‘लिफ्टमन’ला अटक !

पुणे – ससून रुग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय देयके संमत करून देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे घेणार्‍या जालिंदर कुंभार या ‘लिफ्टमन’ला  (उद्वाहकरक्षकाला) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. एका नोकरदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नोकरदाराने १ लाख ४३ सहस्र रुपयांचे वैद्यकीय देयक संमतीसाठी जूनमध्ये सादर केले होते. देयक संमत करण्यासाठी तक्रारदार ससून रुग्णालयात हेलपाटे मारत होते. कुंभार रुग्णांच्या नातेवाइकांकडून देयके घेऊन ती संमत करून देतो, असे सांगून २ टक्के रक्कम घेत होता. त्याने तक्रारदाराकडे ३ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.