मुंबई विद्यापिठाचा ऑक्सफर्ड विद्यापिठाशी शैक्षणिक सामंजस्य करार !

मुंबई – मुंबई विद्यापिठाचे हिंदु अध्ययन केंद्र आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदु स्टडीज’ या ऑक्सफर्ड विद्यापिठाशी जवळून कार्य करणार्‍या संस्थेसमवेत ‘शैक्षणिक सामंजस्य करार’ करण्यात आला आहे. हिंदु तत्त्वज्ञानाच्या सर्वांगीण अध्ययनासाठी या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. या करारान्वये विद्यापिठाचे दोन्ही विभाग ‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदु स्टडीज’च्या सहयोगाने संयुक्त अभ्यासक्रम विकसित करणार आहेत. त्यात हिंदु तत्त्वज्ञानाशी संबंधित पदविका, प्रमाणपत्र, ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात सिद्ध केले जातील.

यासह ‘मंदिर व्यवस्थापना’चा अभ्यासक्रम विकसित करण्यात येणार आहे. भागवत पुराणाच्या महाप्रकल्पासाठी हिंदु अध्ययन केंद्र आणि संस्कृत विभाग विशेष योगदान देणार आहेत. या सामंजस्य कराराद्वारे मुंबई विद्यापिठाच्या दोन्ही विभागांना जागतिक पटलावर ठसा उमटवता येणार आहे, असे मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.