‘देवाविषयी वाटणारे आपलेपण, आपोआपच होणारी भावजागृती, सत्संगातून मिळणारा सहज आनंद’, हे सर्व श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहवासात इतरांना अनुभवण्यास मिळते; मग ते त्यांना ओळखणारे असोत, वा नसोत. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधील दैवी चैतन्य एवढे आहे की, त्यांना एकदा पाहिले, तरी त्यांच्यातील दैवी चैतन्याने कार्यरत असलेल्या आकर्षणशक्तीमुळे व्यक्ती त्यांच्याकडे आपोआप आकर्षिली जाते; परिणामतः ती व्यक्ती स्वतः साधना करण्यास आरंभ करते किंवा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना लक्षात ठेवते आणि तसे बोलूनही दाखवते. या आकर्षणशक्तीमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सर्वांचे प्रेम अनुभवण्यास मिळते. अनेक साधक आणि समाजातील लोक यांना त्यांच्यातील देवत्वाची प्रचीती येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. साधक, तसेच ओळखीचे आणि अनोळखी लोक यांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी प्रेम वाटणे : आम्हा साधकांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी असेच अनुभवायला मिळते. आश्रमातील जुने साधक, त्यांच्या समवेत सेवा केलेले साधक, तसेच त्यांचे समवयस्क साधक या सर्वांनाच त्यांच्याविषयी पुष्कळ प्रेम वाटते, तसेच जे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना काही कारणांमुळे एकदाच भेटले आहेत, मग ते आश्रमात रहाणारे किंवा प्रसारातील साधक असोत, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे नातेवाईक असोत किंवा त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालय यांतील मैत्रिणी असोत, त्यांनाही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी तितकेच प्रेम आणि जिव्हाळा वाटतो.
या सर्वांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ केवळ एकदाच भेटून गेल्यावर ते स्वतः श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना संपर्क करून सांगतात, ‘‘आम्हाला तुमची फार आठवण येते. तुम्ही आम्हाला साधनेचे जे मार्गदर्शन केले, ते इतके सहज होते की, त्यामुळे ‘अध्यात्म किती सुंदर आहे !’, याची अनुभूती आम्हाला येत आहे. आपण आम्हाला नेहमी आपल्या स्मरणात ठेवा आणि आपला कृपाशीर्वाद आमच्यावर सतत असू द्या.’’
१ अ. साधक श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या शाळेतील मैत्रिणीशी भ्रमणभाषवर बोलत असतांना तिने त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करणे आणि त्या वेळी तिची भावजागृती होणे : एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या शाळेतील एका मैत्रिणीशी माझे भ्रमणभाषवर बोलणे झाले. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सेवेत व्यस्त होत्या. त्या ताई (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची मैत्रीण) मला म्हणाल्या, ‘‘परवा माझ्या भ्रमणभाषवर अंजलीचा (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा) नामजपाविषयीचा एक निरोप आला. तेव्हा मला तिचा पुष्कळ आधार वाटला आणि माझी भावजागृती झाली. तिला माझा नमस्कार सांगा. ती देवाचे फार मोठे कार्य करत आहे. ‘तिच्यासारखी मैत्रीण आम्हाला लाभली’, हे आमचे भाग्यच आहे. तिच्या व्यस्ततेमुळे ती बोलू शकत नसली, तरी दादा, तुमच्याशी बोलूनही देव मला तेवढाच आनंद देत आहे.’’ हे बोलतांनाही त्या ताईंची सतत भावजागृती होत होती. आश्चर्य म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ त्यांच्या या मैत्रिणीला गेल्या ३० वर्षांमध्ये २ वर्षांपूर्वी केवळ एकदाच भेटल्या होत्या.
१ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पहाताच त्यांच्याकडे आकर्षिला जाऊन त्यांना आशीर्वाद देण्याविषयी प्रार्थना करणारा पेट्रोलपंपावरील कर्मचारी ! : एकदा आम्ही दौर्याच्या वेळी तमिळनाडू येथील एका शहरात होतो. प्रवासात एका पेट्रोलपंपावर आमची चारचाकी गाडी इंधन भरण्यासाठी थांबली होती. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ गाडीतून उतरून पाय मोकळे करण्यासाठी मोकळ्या जागेत फेरफटका मारत होत्या. तेवढ्यात अकस्मात् त्या पेट्रोलपंपावर काम करणारा एक कर्मचारी त्यांच्याकडे धावत आला आणि तमिळ भाषेत त्यांच्या दिशेने हात करून बोलू लागला. समवेत असणारे दौर्यातील साधक श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी आम्हाला त्याच्या बोलण्याचे मराठीत भाषांतर करून सांगितले. तो कर्मचारी सांगत होता, ‘‘दादा, ‘या माताजी कोण आहेत ?’, हे मला ठाऊक नाही; पण त्यांना पाहून मी त्यांच्याकडे आपोआपच आकर्षिला गेलो. कृपया या माताजींना सांगावे की, त्यांनी केवळ एकदाच त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवावा. मला आणखी काही नको. ‘त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यावर माझे पुढील सर्व आयुष्य चांगले जाईल. माझे भविष्यच पालटून जाईल’, असे मला आतून वाटत आहे.’’ (बाहेर अनेक ठिकाणी लोक श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना आदराने ‘माताजी’, असे संबोधतात.)
१ इ. स्वच्छतेचे काम करणार्या एका स्त्रीने स्वतःच्या मतीमंद मुलाला घेऊन श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणे : तमिळनाडूमधील तिरुवण्णामलई येथे एके ठिकाणी आम्ही २ – ३ दिवस निवासाला होतो. तेथे स्वच्छतेचे काम करणारी एक स्त्री एकदा तिच्या १४ – १५ वर्षाच्या मतीमंद मुलाला घेऊन आली होती आणि दौर्यातील साधक श्री. विनायक शानभाग यांना हात जोडून कळवळून तमिळ भाषेत काहीतरी सांगत होती. विनायकदादांनी ‘ती बाई काय सांगत आहे ?’, हे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगितले. ती बाई म्हणत होती, ‘‘माताजी, हा माझा मतीमंद मुलगा आहे. आज मी त्याला तुमच्या दर्शनासाठी येथे आणले आहे. ‘या जन्मात त्याचा आजार दूर होईल’, अशी माझी आशा उरली नाही; पण एक आई म्हणून माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे, ‘तुम्ही त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिलात, तर पुढच्या जन्मात तरी त्याला निश्चितच चांगले आयुष्य लाभेल’, अशी माझी श्रद्धा आहे.’’
या प्रसंगांमधून ‘मायेतील आकर्षण आणि अध्यात्मातील दैवी आकर्षण’ यांतील भेद लक्षात येतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दौर्यावर असणारे साधक (वर्ष २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |