साधकाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी ‘शस्त्रक्रिया कधी आरंभ झाली आणि कधी संपली’, हे स्वतःसाठी येता-जाता नामजप करत असतांना आपोआप कळणे अन् तेव्हा जागृत ध्यानावस्था अनुभवणे 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘२५.६.२०२६ या दिवशी सकाळी ८ वाजता एका साधकाची शस्त्रक्रिया ठरली होती. त्या दिवशी सकाळी ६ वाजता त्या साधकाचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी आणि शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे अन् लाभदायक होण्यासाठी मी उपाय शोधून दिले. त्याप्रमाणे ते उपाय साधकाच्या नातेवाइकांनी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ‘त्या साधकासाठी पुन्हा काही उपाय करायचे का ?’, असे मला विचारण्यात आले. तेव्हा मी ‘आता त्या साधकाला कोणताही त्रास जाणवत नाही’, असे सांगितले. त्यानंतर मी प्रतिदिन करत असलेला श्रीरामाचा जप येता-जाता करू लागलो. नामजप करत असतांना माझे लक्ष शस्त्रक्रिया होणार असलेल्या साधकावर केंद्रित झाले. माझ्या मनात विचार आला, ‘आता त्या साधकाच्या शस्त्रक्रियेला आरंभ झाला आहे.’ मी येता-जाता माझा नामजप करत होतो; पण माझे लक्ष त्या साधकावर केंद्रित होते. काही वेळाने अकस्मात् मला जाणवले, ‘आता त्या साधकाची शस्त्रक्रिया २५ टक्के पूर्ण झाली.’ त्यानंतर प्रत्येक ५ – १० मिनिटांनी ‘त्या साधकाची शस्त्रक्रिया किती टक्के पूर्ण झाली ?’, हे मला आपोआप कळत होते. ही प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत, म्हणजे १ घंटा चालू होती. तेव्हा मला आतून वाटले, ‘आता शस्त्रक्रिया १०० टक्के पूर्ण झाली आहे.’ मी तसे साधकाच्या नातेवाइकांना कळवले. त्यानंतर १० मिनिटांनी त्यांचा निरोप आला, ‘तुम्ही सांगितले, ते अगदी योग्य आहे. शस्त्रक्रिया छान झाली. त्याला आता बाहेर आणले.’

गुरुकृपेने मला अशी अनुभूती प्रथमच आली. अनुभूतीच्या कालावधीत मी जागृत ध्यानावस्था अनुभवली.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.६.२०२६)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक