चेन्नई (तमिळनाडू) – गेल्या २ दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टी शहराच्या आजूबाजूच्या नद्या आणि तलाव ओसंडून वहात आहेत. कोविलपट्टी पंचायत क्षेत्रात ४० तलाव भरले आहेत. तमिळनाडू सरकारने १८ डिसेंबर या दिवशी तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी या ४ जिल्ह्यांतील सर्व शाळांना सुटी घोषित केली. पूरसदृश परिस्थिती पहाता या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्ती निवारण दलाचे २५० सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
#WATCH | Tamil Nadu: Water enters homes in Kattabomman Nagar in Thoothukudi due to incessant rainfall. pic.twitter.com/mxoVQ9cB0E
— ANI (@ANI) December 18, 2023
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते १८-१९ डिसेंबर या कालावधीत कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी, रामनाथपूरम्, पुदुकोट्टई आणि तंजावर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.