ग्रामीण भागातील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांना आता ५ कोटी रुपयांचा विकास निधी ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाचा निर्णय !

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन

नागपूर – ग्रामीण भागातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना आता ५ कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात येणार आहे. त्यासाठी १४ डिसेंबरला मंत्रीमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ संमत करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. याआधी हा निधी २ कोटी रुपये इतका होता. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक/ यात्रेकरूंना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाने घेतला आहे.

४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभ !

राज्यात ‘ब’ वर्ग दर्जा असलेली १६ नोव्हेंबर २०१२ पूर्वी १०५ तीर्थक्षेत्रे संमत होती. त्यानंतर ३७५ तीर्थक्षेत्रे संमत करण्यात आले. अशी राज्यात एकूण ४८० ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीचा लाभ होईल. त्यासाठी तीर्थक्षेत्रास भेट देणार्‍या भाविकांची संख्या ४ लाख असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना ! 

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ही योजना यापुढे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ या नावाने राबवण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्त निवास, रस्त्यावरील दिवे आणि संरक्षण भिंत उभारणे, तसेच वृक्ष लागवड करणे इत्यादी सुविधा या निधीतून उपलब्ध करून दिल्या जातील.