आरोपी अमोल शिंदे याला अधिवक्ता असीम सरोदे न्यायालयीन साहाय्य करणार !
पुणे : अधिवक्ता असीम सरोदे यांनी संसदेबाहेरील रंगीत धुराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला लातूर येथील अमोल शिंदे याला न्यायालयीन साहाय्य करणार असल्याचे घोषित केले आहे. असीम सरोदे यांनी म्हटले आहे की, अमोलचा उद्देश कुणाला दुखावण्याचा आणि दुखापत करण्याचा नव्हता, तर त्याला केवळ बेरोजगारीचे सूत्र मांडायचे होते. त्यामुळे त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे.
अमोल शिंदे याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाविषयी जाणीव करून देऊन त्याला सकारात्मक शिक्षा निश्चित करावी. तो आतंकवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील, तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. मारहाण करणारे खासदार बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात अनुत्तीर्ण झाले आहेत.
संपादकीय भूमिकानक्षलवादाची चळवळ अशाच प्रकारच्या उद्देशाने सशस्त्र झाली, हे देशाला ठाऊक आहे. सरोदे अशांचे समर्थन करत आहेत, हेच यातून लक्षात येते ! |
शहरी नक्षलवादी युवकांची माथी भडकावून त्यांच्यात बंडखोरीची बीजे रोवत असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संसदेत युवकांनी केलेली घुसखोरी !जगभरात याला चौथ्या स्तराचे युद्ध म्हटले आहे. यात विद्यार्थ्यांना क्रांतीच्या नावे बुद्धीभेद करून त्यांना अन्यायाच्या विरोधात लढण्याचा मुलामा देऊन देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे केले जाते. यातूनच ही मुले पुढे हातात एके-४७ रायफल घेऊन नक्षलवादी बनतात आणि हिंसक मार्ग आचरणात आणतात. असीम सरोदे यांच्या सारख्या स्वतःला राज्यघटनेचे तज्ञ म्हणवणार्यांनी या आंदोलनजीवी मुलाचे वकीलपत्र घेण्यात शहरी नक्षलवादी संबंध दिसून येतो. यात त्या युवकांना भगतसिंह यांच्याशी जोडण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. भगतसिंह यांनी केलेली क्रांती ब्रिटीश सरकारच्या विरोधात होती; कारण ब्रिटीश सत्ताधीश न्याय देतच नव्हते. आज येथे युवकांना लोकशाहीत सर्व मार्ग उपलब्ध असतांना, न्यायालये असतांना, जगभरात आपल्या सर्वोच्च सुरक्षाव्यवस्थेची नाचक्की करण्याला आणि देशाच्या शत्रूंना आक्रमणांचे मार्ग दाखवण्याला कोणती क्रांती म्हणता येईल ? |