संसदेतील घटनेचे महाराष्ट्राच्या विधीमंडळात पडसाद; अभ्यागतांना प्रवेश बंद !

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

आमदारांना मिळणार केवळ २ पास !

लोकसभेत पसरलेला पिवळा विषारी वायू

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) : संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे लोकसभेत २ तरुणांनी मारलेल्या उड्यांचे पडसाद १३ डिसेंबर या दिवशी विधानसभेतही उमटले. संसदेतील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ‘अभ्यागतांना विधानभवनात प्रवेश बंद करण्यात आला आहे, तसेच आमदारांना केवळ २ पास दिले जातील’, असे घोषित केले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर

विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सूत्र मांडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे लक्ष वेधले. ‘लोकसभेत प्रेक्षक सज्ज्यातून २ तरुणांनी सभागृहात उडी मारली. त्यांनी विषारी वायूच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे लोकसभेत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. यासंबंधी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे’, असे चव्हाण यांनी सांगितले. या सूत्राची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर नोंद घेतली. त्यांनी अधिकार्‍यांना आवश्यक तेवढेच पास देण्याची सूचना केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत येतांना दिसलेल्या गर्दीचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले की, मी आताच भोपाळ येथून सभागृहात आलो. लॉबीत एवढी गर्दी होती की, आम्हाला नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे पास जारी करणे अल्प करावे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनीही या घटनेची गंभीर नोंद घेत अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्याचे निर्देश दिले. त्या म्हणाल्या, ‘‘ही एक गंभीर घटना आहे. विधान परिषदेतील गॅलरी पास १३ डिसेंबरपासून बंद करण्यात येत आहेत. अभ्यागतांना सभागृह गॅलरीत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे आमदारांनी पासविषयी पत्र पाठवू नये.’’ लोकसभेतील घटनेनंतर तात्काळ येथील विधीमंडळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यासंबंधी सुरक्षारक्षकांना तात्काळ चोख सुरक्षा पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.