कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर : १२ डिसेंबरला जेव्हा साक्षीदार (पंच) न्यायालयाच्या बाहेर बाकावर बसलेले होते, तेव्हा त्यांच्यासमोरच संशयितांना न्यायालयात उपस्थित करतांना एका हवालदाराने जाणीवपूर्वक ‘अमोल’ म्हणून हाक मारली. त्यामुळे साक्षीदारास हाच ‘अमोल’ हे ओळखणे सोपे झाले. असे करून सरकारपक्ष साक्षीदारांना अप्रत्यक्षरित्या साहाय्यच करत आहे. त्यामुळे संशयितांना न्यायालयात साक्षीदारांच्या समोर उपस्थित न करता अगोदर उपस्थित करावे, अशी मागणी ज्येष्ठ अधिवक्ता अनिल रुईकर आणि अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केली. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. त्या सुनावणीच्या वेळी त्यांनी ही मागणी न्यायाधिशांकडे केली. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर आणि अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.
अमोल काळे यांना जबाबासाठी बाहेर नेतांना त्यांचा तोंडवळा झाकला नाही ! – अधिवक्ता अनिल रुईकर
संशयित अमोल काळे यांचा जबाब घेण्यासाठी विशेष पोलीस पथक पोलीस अधीक्षक कार्यालयातून साक्षीदारांसमवेत ‘संगीता लॉज’ येथे घेऊन गेले. या प्रसंगी, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दीच्या ठिकाणी अमोल काळे यांचा तोंडवळा झाकलेला नव्हता. त्यामुळे तो कुणालाही ओळखणे शक्य झाले, असे अधिवक्ता अनिल रुईकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रसंगी अधिवक्ता डी.एम्. लटके यांनीही साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. या खटल्यात एकूण १२ संशयित आरोपी असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे.
संशयित ज्या ‘लॉज’वर थांबल्याचा सरकार पक्षाचा दावा होता, ते ‘लॉज’ वैध का अवैध हे सांगण्यास पंच असमर्थ !
कॉ. पानसरे प्रकरणात मूल्यवर्धित कर अधिकारी गोविंद पाटोळे यांची साक्ष सरकार पक्षाच्या वतीने १२ डिसेंबरला घेण्यात आली. यात संशयित अमोल काळे यांनी तो आणि शरद कळसकर हे दोघे खोटे नाव धारण करून एप्रिल २०१८ मध्ये ते ‘संगीता लॉज’ येथे वास्तव्यास होते, असे साक्षीदाराने साक्षीत सांगितले. या संदर्भात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कागदपत्रांतील विसंगती दाखवून दिल्यानंतर साक्षीदारांनी हे मान्य केले की, पंचनाम्याच्या प्रसंगी संगीता लॉज ‘अधिकृतरित्या अस्तित्वात होते’, असे त्यांना सांगता येणार नाही, तसेच साक्षीदारांनी ‘संगीता लॉज’ नावाचा फलक बाहेर नव्हता, हेही मान्य केले.