श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, नागपूर.
नागपूर – ‘हमास’ ही आतंकवादी संघटना आहे. ‘हमास’ संघटनेचा कुणी उदो-उदो करत असेल, तर त्याला भारताचे समर्थन नाही. राज्यात कुणीही ‘हमास’च्या आतंकवाद्यांच्या समर्थन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिले.
भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात मुसलमान समाजाची फेरी निघाली. ही फेरी बाजारपेठेत आल्यानंतर काही समाजकंटकांनी ‘हमास’ या आतंकवादी संघटनांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. ‘हमास’चे झेंडेही फडकवले. पोलीस बंदोबस्त तैनात असतांनाही अशा प्रकारे देशाच्या भूमिकेविरुद्ध कृृत्य करण्यात आले. त्यामुळे ‘पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी केली.
यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘इस्रायलवर ‘हमास’ने केलेले आक्रमण चुकीचे आहे’, अशी भूमिका भारत सरकारने स्पष्ट केलेली आहे. ‘पॅलेस्टाईन’च्या बाजूने उभे रहाण्याच्या भूमिकेवरही भारत ठाम आहे. आपण ‘पॅलेस्टाईन’च्या बाजूने असलो, तरी ‘हमास’च्या बाजूने नाही. ‘हमास’ ही आतंकवादी संघटना म्हणून घोषित झालेली आहे.