सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) – ‘व्होकेशनल बोर्डा’च्या वतीने ‘अकाऊटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा कोर्स चालवला जातो. यामध्ये विद्यार्थिनींना एक वर्ष संबंधित बँकेमध्ये विद्यावेतनावर काम करावे लागते; मात्र एका वर्षापासून हे विद्यावेतन थकले आहे. तातडीने विद्यावेतन न मिळाल्यास ७ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्याची चेतावणी विद्यार्थिनींनी दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन झोपले आहे का ? – संपादक)
शहरातील ‘जनता सहकारी बँके’च्या सहयोगाने व्होकेशनल बोर्ड हा अभ्यासक्रम चालवत आहे. व्होकेशनल बोर्ड आणि जनता सहकारी बँक अर्धे-अर्धे वेतन विद्यार्थिनींना देऊ करते. २२ विद्यार्थिनींनी वर्षभर बँकेत काम करून अभ्यासक्रम पूर्ण केला; मात्र बँक आणि बोर्ड यांच्या वतीने दिले जाणारे ७ सहस्र रुपये विद्यावेतन गत वर्षभरापासून थकले आहे. याविषयी व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयाचे व्यवस्थापक पांडुरंग देशामने आणि जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल जठार दोघांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. या २२ विद्यार्थिनींची गत वर्षभरापासून विद्यावेतनासाठी पायपीट चालू आहे; मात्र दोन्ही आस्थापने विद्यार्थिनींना विद्यावेतन देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. या २२ विद्यार्थिनींनी २८ नोव्हेंबर या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.