|
न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा अमेरिकेत रहाणारा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांनी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे. गुप्ता याला हत्येसाठी भारतीय अधिकार्याने सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अधिकार्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पन्नू याच्यावर न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक आक्रमणाचा करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप अमेरिकेच्या सरकारने काही दिवसांपूर्वीच केला होता. यात भारताचा हात होता. हा कट उधळून लावला. ‘हे आक्रमण कोणत्या दिवशी होणार ?’, हे सांगण्यात आले नव्हते. याविषयी भारतानेही चौकशी करण्याचे मान्य केले होते. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्यानंतर अमेरिकेच्या अधिकार्यांनी हे सूत्र भारतासमोर मांडले होते.
१. २९ नोव्हेंबर या दिवशी न्यूयॉर्कमध्ये निखिल गुप्ता याच्या विरोधात प्रविष्ट करणारे आरोपपत्र समोर आले आहे. त्यात त्याच्यावर खुनाचा कट रचणे, पैसे घेऊन हत्येचा प्रयत्न करणे, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपपत्रात १०० डॉलरचाही उल्लेख आहे. ही रक्कम गुप्ता याला आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आली होती. आरोपपत्रात भारतीय अधिकार्याला ‘सीसी-१’ असे संबोधण्यात आले आहे. त्यानुसार सीसी-१ हा भारत सरकारच्या एका यंत्रणेचा कर्मचारी आहे, ज्याने अनेक वेळा स्वत:ला ‘वरिष्ठ क्षेत्र अधिकारी’ म्हणून वर्णन केले आहे. ‘हा अधिकारी सुरक्षा व्यवस्थापन आणि गुप्तचर विभाग येथील उत्तरदायी अधिकारी आहे’, असे म्हटले आहे.
२. ५२ वर्षीय निखिल गुप्ता पूर्वी अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची आंतरराष्ट्रीय तस्करी करत होता. अमेरिकेला कटाची माहिती मिळाल्यानंतर निखिल याला चेक रिपब्लिक येथे तेथील अधिकार्यांना सांगून ३० जून या दिवशी अटक करण्यात आली आणि नंतर त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. निखिल याला या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
३. निखिल गुप्ता याने हत्या करणार्याला १ लाख अमेरिकी डॉलर देण्याचे मान्य केले. यातील १५ सहस्र डॉलर दिले.
कसा होता कट ?
एका भारतीय अधिकार्याच्या आदेशानुसार निखिल याने पन्नूला मारण्यासाठी एका गुन्हेगाराशी संपर्क साधला; पण प्रत्यक्षात हा गुन्हेगार अमेरिकी हस्तक होता. या हस्तकाने निखिलची ओळख दुसर्या एका गुप्तहेर अधिकार्याशी करून दिली जो हत्या करण्यास सिद्ध होता. यासाठी सुमारे ८३ लाख रुपयांचा सौदा करण्यात आला. करारानंतर ‘सीसी-१’ या भारतीय अधिकार्याने गुप्ता याला पन्नूच्या न्यूयॉर्कमधील घराचा पत्ता, दूरभाष क्रमांक आणि दिनचर्या यांची संपूर्ण माहिती दिली. निखिल गुप्ता याने हत्या करणार्याला लवकरात लवकर काम पूर्ण करण्यास सांगितले. तथापि ‘ज्या दिनांकांना भारत आणि अमेरिका यांच्या अधिकार्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका होणार होत्या त्या दिनांकांना हत्या करू नये’, असे त्यांना सांगण्यात आले. याच काळात पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते.
गुप्ता याने हत्या करणार्याला सांगितले होते की, हरदीप सिंग निज्जरदेखील त्याच्या लक्ष्यांच्या सूचीत आहे. कॅनडात त्याच्या हत्येनंतर सीसी-१ ने पन्नूशी संबंधित एक बातमी गुप्ता याला पाठवली होती. त्यात भारतीय अधिकार्याने त्याला मारणे आता प्राधान्य असल्याचे म्हटले होते.
भारताचे स्पष्टीकरण
या प्रकरणी भारताने स्पष्टीकरण दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, भारत या आरोपांकडे गांभीर्याने पहात आहे. एका व्यक्तीच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयातील खटला प्रविष्ट करण्यात आला आहे, त्याचा भारतीय अधिकार्याशी संबंध जोडण्यात आला आहे, हा चिंतेचा विषय आहे. हे भारत सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध आहे. अमेरिकेशी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना माहिती दिलेली आहे. आम्ही या माहितीला गांभीर्याने घेतले आहे. यामुळेच आपण उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकागेल्या काही वर्षांपासून गुरपतवंत सिंह पन्नू सातत्याने भारतविरोधी विधाने करत आहे. भारतात आतंकवादी कारवाया करण्याच्या धमक्या देत आहे. हे अमेरिकेला दिसत नाही का ? त्याच्यावर अमेरिका कारवाई का करत नाही ? यातून अमेरिकेचा भारताच्या संदर्भातील दुटप्पीपणा स्पष्ट होतो. अशा अमेरिकेवर भारताने विश्वास ठेवणे म्हणजे आत्मघात करण्यासारखेच आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! |