संस्कृत भाषेचे सौंदर्य

‘संतोष’ हीच मनुष्याची खरी संपत्ती !

सर्वाः सम्पत्तयस्तस्य सन्तुष्टं यस्य मानसम् ।
उपानद्गूढपादस्य ननु चर्मावृतैव भूः ।।

– हितोपदेश, मित्रलाभ, श्लोक १३८

अर्थ : ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे, (म्हणजे तो पृथ्वीवर कुठेही फिरला, तरी त्याच्या पायाखालची भूमी त्याला (त्या पादत्राणामुळे) चामड्याचीच वाटेल.)

योजक हा खरोखरच दुर्लभ असतो !

‘योजकस्तत्र दुर्लभः ।’ म्हणजे ‘योजक हा खरोखरच दुर्लभ असतो.’ योजक जर चतुर असला, भगवन्मय असला, तर सगळ्यांचा, म्हणजे अगदी टाकाऊ समजलेल्याचाही उपयोग करून घेतो. त्याच्यासंदर्भात दुःख वरदान ठरते, तसेच शापही वर ठरतो. तो विषाचा उपयोग रोग हटवण्यासाठी करतो. चतुर माणूस दुःखाला सुख बनवतो आणि शापाचा वर बनवतो. अर्जुनाला उर्वशीचा एक वर्ष नपुंसकत्वाचा शाप असतो. अज्ञातवासात विराटाच्या नगरीत तो बृहन्नडा (नर्तकी) होतो !

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०१४)