ओलिसांना विनाअट सोडण्याचे आवाहन !
वॉशिंग्टन (अमेरिका) – २९ नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने भारत पॅलेस्टिनी लोकांसमवेत सार्वकालिक संबंध असल्याची पुष्टी करतो. पॅलेस्टाईन येथे शांती आणि समृद्धी नांदावी, या सूत्राचे आम्ही समर्थन करतो. मध्य-पूर्वेत स्थिती तणावग्रस्त असून इस्रायल-हमास युद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. हे अस्वीकारार्ह आहे. आम्ही याची कठोर शब्दांत निंदा करतो. आम्ही त्या सर्व उपायांवर काम करत आहेत, ज्याने संपूर्ण क्षेत्रात शांतता प्रस्थापित होईल. उभय देशांमधील युद्धविरामाचे आम्ही स्वागत करतो, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी येथे केले.
(सौजन्य : The Indian Express)
कंबोज म्हणाल्या की,
१. युद्ध चालू झाल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी शांती प्रस्थापित करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आमच्या नेत्यांनी मानवीय संकटावर नेहमीच काळजी व्यक्त केली आहे.
२. भारत आंतकवाद आणि नागरिकांना ओलीस ठेवण्याची कठोर शब्दांत निंदा करतो.
३. ओलिसांना सोडणे हे स्वागतार्ह आहे; परंतु सर्वच ओलिसांना विनाअट सोडले पाहिजे.
भारताने गाझामध्ये ७० टन साहित्य पाठवले !
कंबोज पुढे म्हणाल्या की, भारताने गाझा येथे ७० टन साहित्य पाठवले आहे. यामध्ये १६.५ टन साहाय्य हे केवळ औषधे आणि चिकित्सा सुविधा यांचेच आहे.