Exclusive : खासगीकरण नव्हे, ‘एस्.टी.’ महाराष्ट्र शासनाचीच रहाणार !

एकेकाळी भरभराटीला असणारे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ’ अस्वच्छ बसस्थानके, भंगारात काढायच्या स्थितीला आलेल्या बसगाड्या आणि त्यात राजकीय अनास्थेमुळे अक्षरश: डबघाईला आले होते. त्यात कोरोना आणि कर्मचार्‍यांचा दीर्घ संप यांमुळे एस्.टी.ची स्थिती दयनीय झाली. संपानंतर कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात पुन्हा सलोखा प्रस्थापित करणे, कोरोनाकाळानंतर शासनाच्या साहाय्याने नवनवीन योजना चालू करणे आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवून त्यासाठी नेटाने प्रयत्न करणे यांसाठी एस्.टी.चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. शेखर चन्ने यांनी केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत. एस्.टी.च्या दुरवस्थेमुळे मधल्या काळात अशी वृत्ते माध्यमांवर प्रसिद्ध झाली होती; मात्र सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस्.टी. या संकटांतून बाहेर पडत असून खासगीकरणाचे काळे ढग विरळ होत आहेत, हे निश्चितच सुखावह आहे. कोरोना महामारी आणि संप काळातील ही एस्.टी.ची पडद्यामागील बाजू श्री. शेखर चन्ने यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये प्रथमच उघड केली. ‘एस्.टी. लाभात आहे कि तोट्यात ?’, याविषयी सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल राहिले आहे. याची समर्पक माहिती श्री. शेखर चन्ने यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहे. शासनाच्या सहकार्याने एस्.टी.ला पुढे नेण्यासाठी श्री. शेखर चन्ने यांनी केलेले प्रयत्न महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निश्चितच लाभदायी ठरतील.

१. एस्.टी. कायमस्वरूपी बंद होण्याची आलेली स्थिती

कोरोना महामारीच्या काळात एस्.टी.ची सर्व कामे बंद पडली होती. महामंडळाकडे राखीव निधीही नव्हता आणि एस्.टी.चे उत्पन्नही शून्य होते. दळणवळण बंदीच्या काळात ३ मास एस्.टी. कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठीही महामंडळाकडे पैसे नव्हते. या काळात एस्.टी. कायमस्वरूपी बंद होईल कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली होती. या काळात मे २०२० मध्ये कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी राज्यशासनाने प्रथम एस्.टी. महामंडळाला १ सहस्र कोटी रुपये इतके अर्थसाहाय्य केले. यातून कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात आले. टप्प्याटप्प्याने दळणवळण बंदी काळातील निर्बंध उठवण्यात आले. यानंतर ‘एका आसनावर एकच प्रवासी’ याप्रमाणे एस्.टी. पुन्हा चालू करण्यात आली. गाड्या पूर्ण क्षमतेने चालवण्यात येत नसल्यामुळे यातून एस्.टी.ला आर्थिक तोटाच होत होता. इंधन आणि सुटे भाग यांची खरेदी करण्यासाठीचे पैसेही एस्.टी.कडे नव्हते. सरकारकडून प्रतिमासाला मिळणार्‍या अनुदानातून कर्मचार्‍यांचे वेतन द्यावे लागत होते.

श्री. शेखर चन्ने

२. बंद गाड्या रस्त्यावर उतरवण्याचे मोठे आव्हान !

सप्टेंबर २०२१ पर्यंत कोरोना महामारीचे वातावरण निवळले. एस्.टी. पूर्ववत् चालू झाली; मात्र दिवाळीपूर्वीच एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाची नोटीस आली. हा संप ६ मास चालला. संपाच्या काळात एस्.टी.च्या गाड्या विनाउपयोग उभ्या होत्या. या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती यांसाठीही कर्मचारी नव्हते. इतका काळ बंद स्थिती असल्यामुळे गाड्यांचे इंजिन खराब झाले. टायरमध्ये हवा भरणे, गाड्यांची दुरुस्ती ही कामेही झाली नाहीत. या स्थितीमुळे एस्.टी.च्या १४ सहस्र गाड्यांपैकी केवळ ७ – ८ सहस्र गाड्या रस्त्यावर येऊ शकत होत्या. अन्य गाड्यांच्या इंजिनची कामे करावी लागणार होती. त्यामुळे संपानंतर अशा स्थितीतील गाड्या रस्त्यावर आणणे, हेच महामंडळासाठी मोठे आव्हान होते.

३. एस्.टी. पूर्वपदावर येण्यास लागले ७-८ मास !

दळणवळण बंदीच्या काळात एस्.टी.ला सुटे भाग देणार्‍या पुरवठादारांची देणी थकली होती. पूर्वी घेतलेल्या टायर्सचे पैसेही देणे बाकी होते. आधीचे पैसे न मिळाल्यामुळे नवीन साहित्य देण्यास पुरवठादार सिद्ध नव्हते. त्या वेळी त्यांना काही प्रमाणात रोख पैसे देऊन या चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. अनेक गाड्यांचे इंजिन बंद पडल्यामुळे ते पालटावे लागले. अनेकदा गाड्या रस्त्यावरच ‘ब्रेकडाऊन’ होत होत्या. त्यामुळे गाड्यांचे सुटे भाग स्थानिक पातळीवर घ्यावे लागत होते. त्यांचा दर्जा चांगला नसायचा. या सर्वांचा त्रास होत होता. यातून गाड्यांची स्थिती पूर्ववत् होण्यासाठी ३ मास गेले आणि एस्.टी.च्या गाड्यांची स्थिती पूर्वपदावर येण्यास ७-८ मास गेले.

४. नवीन योजना संजीवनी ठरली !

६५ वर्षे वयाहून अधिक व्यक्तींना ५० टक्के दराने तिकीट, अंध आणि अपंग व्यक्तींना विनामूल्य प्रवास आदी एस्.टी.च्या विविध योजना आधीपासून चालू होत्या; मात्र ७५ आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना विनामूल्य प्रवास ही योजना एस्.टी.साठी खर्‍या अर्थाने संजीवनी ठरली. यापूर्वी पैसे प्राप्तीचे साधन नसल्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती प्रवास टाळत असतील; मात्र या योजनेमुळे त्यांना प्रवासाची संधी मिळाली. यामुळे देवदर्शनाला जाणे, मुलामुलींना भेटायला जाणे अशा प्रकारे वयोवृद्ध व्यक्तींचा प्रवास वाढला. त्यांच्यासमवेत त्यांची नातवंडे आणि अन्य नातेवाईक असल्यामुळे एस्.टी.च्या प्रवाशांची संख्या वाढली. पर्यायाने एस्.टी.ची मिळकत वाढली. या योजनेमुळे वयोवृद्ध प्रवाशांमध्ये ४ टक्के वाढ झाली, तसेच वयोवृद्ध नागरिक प्रवास करू लागल्यामुळे त्यांची प्रकृतीही निरोगी रहाण्यास साहाय्य झाले आहे. त्यांची निर्णय क्षमताही वाढली आहे. हा एक प्रकारे सामाजिक लाभ झाला आणि एस्.टी.च्या उत्पन्नाचे साधनही मिळाले आहे.

५. महिलांना ५० टक्के तिकीट : एक यशस्वी योजना !

महिला एस्.टी. ने प्रवास करतात, तेव्हा त्यांच्यासमवेत त्यांचा भाऊ, पती, मुलगा आदी पुरुष मंडळीही असतात. त्यामुळे महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलतीच्या योजनेमुळे एस्.टी.च्या प्रवाशांमध्ये आपोआप वाढ झाली. मधल्या काळात दुरावलेला प्रवासीवर्ग या योजनेमुळे पुन्हा एस्.टी.शी जोडला गेला. ही योजना केवळ लालपरी गाड्यांसाठी नसून एस्.टी.च्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी आहे. या योजनेमुळे मुंबईतून पुणे येथे जाणार्‍या महिलाही एस्.टी.ने प्रवास करू लागल्या आहेत. या योजनेमुळे महिलांचेही सबलीकरण झाले आणि दळणवळण बंदीनंतर पुन्हा उभे रहाण्यासाठी एस्.टी.लाही बळ मिळाले. महिलांसाठीची ही योजना पुष्कळच यशस्वी ठरली. या योजनांसाठीचा पैसा सरकारकडून एस्.टी. महामंडळाला प्रतिमास मिळत आहे.

६. एस्.टी. लाभात कि तोट्यात ?

भांडवलाचा आपण घसारा काढतो. एस्.टी.च्या गाड्या, बसस्थानकांच्या इमारती यांचे काही वर्षांनी आयुर्मान न्यून होते. हा सर्व घसारा आर्थिक ताळेबंदामध्ये (‘बॅलन्स शीट’मध्ये) दाखवला जातो. त्यानुसार पाहिले, तर आर्थिक ताळेबंदानुसार एस्.टी. तोट्यात आहे. प्रत्यक्षात नियमितचे उत्पन्न आणि व्यय यांवर याचा परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे एस्.टी. गाड्यांच्या प्रति किलोमीटर धावण्यावर झालेला व्यय आणि त्यातून प्राप्त उत्पन्न यांतून एस्.टी. तोट्यात आहे कि लाभात ? हे काढले जाते. प्रति किलोमीटरमध्ये व्ययाहून मिळकत अधिक असेल, तर लाभ आणि व्यय अधिक असेल, तर तोटा. भांडवलाच्या घसार्‍याचा विचार केला, तर एस्.टी. तोट्यातच आहे; परंतु हा तोटा पुस्तकावर दिसतो. एस्.टी.मधून यापूर्वी जितके प्रवासी प्रवास करत होते, तेवढे प्रवासी सद्यःस्थितीतही एस्.टी.तून प्रवास करत आहेत. संपाच्या काळात एस्.टी.ची आर्थिक हानी झाली; परंतु अन्य काळात एस्.टी.चे उत्पन्न नेहमीच चांगले राहिले आहे.

७. स्वत:च्या जागेपासून एस्.टी. महामंडळ उत्पन्न मिळवणार !

एस्.टी. बसस्थानकांच्या अनेक इमारती ४०-५० वर्षे इतक्या जुन्या झाल्या आहेत. एस्.टी. बसस्थानकांच्या कोणत्या जागा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा !’ (बी.ओ.टी.) तत्त्वावर देता येतील ? याचे सर्वेक्षण एस्.टी. महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथम मोठ्या शहरांमधील बसस्थानकांवर ‘बी.ओ.टी.’ तत्त्वावर इमारती बांधण्यात येतील. काही ठिकाणी बसस्थानकांच्या इमारतीचे काम एस्.टी. महामंडळ स्वत:ही करणार आहे. यांतून एस्.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल.

ज्या काळात एस्.टी. उदयोन्मुख होती, त्या वेळी राज्यात एस्.टी. महामंडळाची मक्तेदारी होती. संपूर्ण प्रवासी एस्.टी.वर अवलंबून होते. त्या वेळी मुंबईतील काही इमारतींमध्ये एस्.टी. महामंडळाच्या सदनिका घेऊन ठेवण्यात आल्या होत्या. त्या आजही आहेत.

८. एस्.टी.ला पुढे नेण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता !

आजही सर्वमान्यांचे प्राधान्य एस्.टी.लाच आहे. ग्रामीण भागात एस्.टी.पेक्षा दुःस्थितीत असलेल्या डमडममधूनही नागरिक प्रवास करतात; कारण आमची बस त्या वेळेत पोचत नाही. एस्.टी. सेवेमध्ये आणखी सुधारणा आणि नवीन तंत्रज्ञान यांचा उपयोग व्हायला हवा. बसस्थानकांच्या स्वच्छतेचा विषय दैनिक ‘सनातन प्रभात’ने मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही स्वच्छता अभियानाची घोषणा केली. आता एस्.टी.मध्ये सुधारणा होत आहे. हे कुणा एका व्यक्तीने केल्यामुळे झालेले नाही. यामध्ये एस्.टी. कर्मचारी आणि शासन यांचे सांघिक प्रयत्न आहेत. एस्.टी.ने दर्जेदार सेवा दिल्यास प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळणार नाहीत, हेही निश्चित !

मे २०२२ मध्ये एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप मिटला. एस्.टी.च्या इतिहासातील हा सर्वांत मोठा संप होता. सर्वसाधारणपणे संपाच्या काळात नियमानुसार संपकर्त्यांवर कारवाई करावी लागते. त्यामुळे संप मिटल्यानंतरही कर्मचारी आणि व्यवस्थापन यांमध्ये दुरावा निर्माण होतो; परंतु या संपानंतर कर्मचारी अन् व्यवस्थापन यांमध्ये कोणताही दुरावा राहिला नाही. संप मिटल्यावर सर्व कर्मचार्‍यांनी चांगले सहकार्य केले. कर्मचारी आणि अधिकारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.

९. येत्या ३-४ मासांत एस्.टी.विषयी चांगली बातमी मिळेल !

दळणवळण बंदीच्या पूर्वी शासनाकडून पैसे घेण्याची वेळ एस्.टी. महामंडळावर आली नव्हती. कार्यालयीन व्ययासाठी बाहेरून आर्थिक साहाय्य घेण्याची आवश्यकता लागता कामा नये. संपाच्या काळात एस्.टी. तोट्यात जाते; परंतु अन्य काळात एस्.टी. लाभात आहे. हा लाभ वर्षभर रहायला हवा. एस्.टी. सर्वकाळ लाभात यायला अधिक वेळ लागणार नाही. येत्या ३-४ मासांत चांगली बातमी मिळेल !

– श्री. प्रीतम नाचणकर, वृत्तप्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई.

ईश्वराने यश दिले ! – शेखर चन्ने

दळणवळण बंदी आणि त्यानंतर ६ मासांचा संप हे सर्व पहाता एस्.टी.चे काय होईल ? या विचाराने कधी कधी वैफल्य येत होते. यातून काही मार्ग निघेल कि नाही ? याची चिंता वाटत होती. त्यातूनही धारिष्ट्य बाळगून आम्ही काम करत राहिलो आणि ईश्वराने यश दिले, अशी कृतज्ञता शेखर चन्ने यांनी व्यक्त केली. – श्री. प्रीतम नाचणकर, वृत्तप्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका आणि एस्.टी. महामंडळाची कार्यवाही !

श्री. प्रीतम नाचणकर

१. एस्.टी.च्या अस्वच्छ बसस्थानकांविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून विशेष वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. राज्यातील १८ बसस्थानकांच्या अस्वच्छतेची वृत्ते छायाचित्रासह प्रसिद्ध केली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाने श्री. शेखर चन्ने यांची भेट घेऊन त्यांना ही वृत्ते आणि निवेदन सादर केले. या वेळी श्री. शेखर चन्ने यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मे २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’, या नावाने योजना आणली.

२. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन नवीन सरकार आल्यानंतर ९ मासांनंतरही एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले नव्हते, तसेच परिवहन आयुक्तांचे स्थानांतर होऊन ३ मास झाले, तरी नवीन आयुक्तांऐवजी आधीचे नाव तसेच होते. याविषयी ५ मे २०२३ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये याविषयीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही पालट महामंडळाच्या संकेतस्थळावर करण्यात आले.

– श्री. प्रीतम नाचणकर, वृत्तप्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई.