पणजी, २१ नोव्हेंबर (वार्ता.) : गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारी मासाच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे आणि अधिवेशनाचा दिनांक लवकरच घोषित केला जाणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. काणकोण येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकोत्सवाविषयी माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत सभापती रमेश तवडकर यांनी पुढील माहिती दिली.
काणकोण येथे ८ ते १० डिसेंबर या कालावधीत लोकोत्सव
आदर्श ग्राम, काणकोण येथे ८ ते १० डिसेंबर या कालावधीत आदर्श युवक संघ आणि बलराम शिक्षण सोसायटी यांच्या वतीने लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
यानंतर पुढील ३ दिवस सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमांतून गोव्यातील ग्राम अन् लोक संस्कृती यांचे दर्शन घडवले जाणार आहे. देशभरातील १२ राज्यांतील कलाकारांना लोकोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यंदाच्या लोकोत्सवातील ६ सत्रांना उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्र मिळून एकूण ६ राज्यांतील सभापतींना निमंत्रित करण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीला वर्ष २०२७ पर्यंत राजकीय आरक्षण
अनुसूचित जमातीला आगामी विधानसभा निवडणुकीत म्हणजेच वर्ष २०२७ पर्यंत राजकीय आरक्षण दिले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसह इतर शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे.
कोमुनिदादची घरे कायम करण्याचा सरकारचा निर्णय योग्य
काणकोण येथे कोमुनिदाद भूमीतील ७० घरांना मोडण्याचे आदेश तेथील कोमुनिदाद प्रशासनाने दिले आहेत. कोमुनिदादच्या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोमुनिदादची घरे कायम करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे.
मी सभापती पदावर समाधानी
मला मंत्रीपदाची इच्छा नाही आणि मी पक्षाकडे कधीच मंत्रीपद मागितले नाही. मी ज्या पदावर आहे त्यावर समाधानी आहे. या पदावर राहूनही मला सामाजिक कामे करायला मिळत आहेत.