विषबाधा
‘कोणते विष रुग्णाच्या पोटात गेले आहे’, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. त्या विषाविषयी माहिती देणारे पत्रक उपलब्ध झाल्यास ते वाचा. त्यात विषामुळे बाधा झाल्यास करावयाच्या उपचारांविषयी माहिती मिळू शकते.
१. विष घेतल्यानंतर प्रकृतीच्या कोणत्या तक्रारी चालू झाल्या, ते रुग्णाला विचारा.
२. रुग्णाने घेतलेले विष नुकतेच (साधारणपणे ३० मिनिटांपेक्षा अल्प कालावधी) पोटात गेले असेल आणि तेे विष ‘चरचरणारे किंवा जळजळ करणारे (करोसिव्ह) विष नाही’, अशी निश्चिती असेल, तर रुग्णाकडून उलटी करवून घ्या. उलटी होण्यासाठी रुग्णाच्या घशाच्या मागील बाजूस चमच्याने गुदगुल्या करा किंवा त्याला दोन चमचे मीठ विरघळवलेले एक फुलपात्र (ग्लास) कोमट पाणी पिण्यास द्या.
३. रुग्णाकडून उलटी करवून घेणे शक्य नसल्यास त्याने घेतलेले विष पचनसंस्थेद्वारे शरिरात शोषले जाण्याचा वेग मंदावण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा.
अ. रुग्णाला भरपूर थंड पाणी (शक्य असल्यास बर्फाचे पाणी) पिण्यास द्या.
आ. रुग्णाला एक फुलपात्र (ग्लास) शहाळ्याचे पाणी अथवा दूध पिण्यास द्या.
इ. एक कच्चे अंडे फोडून ते पाण्यात मिसळून ते पाणी रुग्णाला पिण्यास द्या.
कुत्रा चावणे
१. कुत्रा चावल्यानंतर जोपर्यंत ‘तो पिसाळलेला नाही’, हे निश्चितपणे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ‘पिसाळलेला कुत्रा चावला’, असे गृहित धरून सर्व प्रथमोपचार करा.
२. रुग्णाची जखम लगेच साबणाने (उपलब्ध असल्यास ‘लाईफबॉय’ सारख्या ‘कार्बोलिक’ आम्ल असणार्या साबणाने) हळूवारपणे धुवा. नंतर जखमेवर वहाते पाणी (उदा. नळाचे पाणी) सलग न्यूनतम १० मिनिटे सोडून ती जखम धुवा. श्वानदंश झाल्यावर लवकरात लवकर रुग्णाची जखम धुवायची असते. असे केल्याने दंशातून जखमेत गेलेले विषाणू शरिराबाहेर टाकले जातात आणि त्यांना शरिरात पसरण्यास संधी मिळत नाही. श्वानदंश झाल्यानंतर जखम धुण्यास उशीर झाला असला, तरी जखम धुवावी. याचे कारण असे की, जखमेत राहिलेले थोडेफार विषाणू तरी शरिराबाहेर टाकले जातात.
३. रुग्णाची जखम धुतांना जखमेला स्वतःच्या हातांचा स्पर्श होणार नाही, याची दक्षता घ्या. (जखमेला स्पर्श करायचाच असेल, तर एकवापर (डिस्पोजेबल) हातमोजे घाला.)
४. रुग्णाच्या जखमेला माती, मिरची इत्यादी लागू देऊ नका.
५. पुढील उपचारांसाठी रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात पाठवा.
सर्पदंश
१. उंच वाढलेल्या गवतामध्ये दंश झालेल्या अथवा अन्य अडचणीच्या ठिकाणी असणार्या रुग्णाला जवळच्या मोकळ्या आणि सुरक्षित स्थळी न्या.
२. पायाला दंश झाला असल्यास रुग्णाला चालायला लावू नका.
३. रुग्णाला भूमीवर अथवा पलंगावर आडवे होण्यास सांगा किंवा झोपवा.
४. रुग्णाला मानसिक आधार द्या.
५. रुग्णाच्या हाताला सर्पदंश झाला असल्यास त्याच्या हातातील अंगठी, घड्याळ, बांगड्या, तसेच पायाला सर्पदंश झाला असल्यास पादत्राणे, जोडवी, पैंजण आदी वस्तू काढून त्याच्या नातेवाइकाकडे द्या; कारण दंश झालेला भाग सुजला, तर अशा वस्तूंमुळे रुग्णाची समस्या अजून वाढते.
६. दंश झालेल्या अवयवाची हालचाल होऊ देऊ नका. रुग्णालाही तशी हालचाल न करण्यास सांगा.
७. सर्पदंशामुळे झालेल्या जखमेवर निर्जंतुक गॉज ड्रेसिंग (ते उपलब्ध नसल्यास साधे ड्रेसिंग, रुमाल आदी) ठेवून तेथे चिकटपट्टी लावा.
८. हात वा पाय यांना सर्पदंश झाला असल्यास त्या अवयवाच्या दंश झालेल्या स्थानाच्या दोन्ही बाजूंच्या सांध्यांची हालचाल होणार नाही, अशा प्रकारे संबंधित अवयवाला आधारफळी बांधा.
९. रुग्णाला झोपू देऊ नका. त्याला झोप लागल्यास त्याच्या लक्षणांत अथवा त्याला होत असणार्या त्रासांत होणारे पालट (बदल) लक्षात येणार नाहीत.
१०. रुग्णाला रुग्णालयात हलवतांना ‘त्याचा सर्पदंश झालेला अवयव हृदयाच्या पातळीपेक्षा खालच्या पातळीवर राहील’, असे करण्याचा प्रयत्न करा.
अस्थम्यामुळे (दम्यामुळे) रुग्ण गुदमरणे
फुप्फुसांतील श्वासनलिका अत्यंत आकुंचित झाल्याने हा विकार होतो. या विकारात श्वास बाहेर सोडण्याची क्रिया रुग्णासाठी अधिक त्रासदायक असते.
१. दम्यामुळे लागलेली धाप लवकर आटोक्यात न आल्यास रुग्ण अतिशय दमतो. त्यामुळे रुग्णाला ज्या शारीरिक स्थितीत चांगले वाटेल, त्या स्थितीत रहाण्यास सांगा. (रुग्णाला बसलेल्या स्थितीत चांगले वाटण्याची शक्यता अधिक असते.)
२. रुग्णाला मानसिक आधार द्या.
३. रुग्णाजवळ औषध असल्यास त्याला ते त्वरित घेण्यास सांगा. त्याच्याजवळ ‘इनहेलर’ असल्यास त्याला त्यातील औषधाचा फवारा तोंडाने श्वासासमवेत आत ओढण्यास सांगा आणि रुग्णाला आधुनिक वैद्याकडे पाठवा.
हिंदु जनजागृती समितीच्या विनाशुल्क ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सहभागी व्हा !
सध्याच्या भीषण काळाची आवश्यकता लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समिती देशभरात विनाशुल्क प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग आयोजित करते. या प्रशिक्षणवर्गात प्रथमोपचाराचे तात्त्विक ज्ञान शिकवण्यासह प्रायोगिक भागही शिकवला जातो. आपणही या प्रशिक्षणवर्गात सहभागी होऊन कुटुंबहित, समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण ही उद्दिष्टे साध्य करा !
संपर्क : ७७३८२३३३३३
प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य
- ‘गॉज ड्रेसिंग्स्’
- बॅण्ड एड
- डिस्पोजेबल मास्क
- डेटॉल
- डिस्पोजेबल ग्लव्हज्
- ऑक्सिमीटर
- क्रेप बँडेजेस्
- कापूस
- मेडिकल टेप
- थर्मामीटर
- सॅनिटायझर
- ट्विजर
- ‘सर्जिकल’ कात्री
- आईस पॅक
- ‘सोफ्रामायसीन’ मलम
- अँटिबायोटिक मलम
- आय ड्रॉप
- खोकल्याचे औषध
- बेटाडीन
- वेदनाशामक गोळ्या