रुग्णालयाखाली हमासचा तळ असल्याचा पुरावा ! – इस्रायल

अल् शिफा रुग्णालयाखाली सापडला बोगदा !

तेल अविव (इस्रायल) – गाझातील अल्-शिफा रुग्णालयावर इस्रायलच्या सैन्याने नियंत्रण मिळवल्यानंतर आता तेथे एक बोगदा सापडल्याचे इस्रायली सैनिकांनी सांगितले. हमासच्या आतंकवाद्यांनी या रुग्णालयाखाली त्यांचे मुख्यालय बनवले होते, असा दावा इस्रायलच्या सैन्याकडून केला जात होता, तो दावा सत्य झाल्याचे सैन्याने म्हटले आहे. ५५ मीटर लांब आणि १० मीटर खोल असलेल्या या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच विविध सैनिकी कारवायांसाठीची यंत्रे होती. इस्रालयच्या सैन्याला रोखण्यासाठी येथे ब्लास्टप्रुफ(स्फोटविरोधी) दरवाजा, गोळीबारासाठी भोक यांसारख्या व्यवस्था निर्माण करण्यात आल्याचे आढळून आले. या दरवाजाच्या पलीकडे काय आहे ?, हे मात्र सांगण्यात आलेले नाही.
इस्रायलच्या सैन्याने म्हटले की, गेल्या ४ आठवड्यांपासून आम्ही सांगत आहोत की, गाझातील नागरिक आणि अल्-शिफा रुग्णालयातील रुग्ण याचं हमास मानवी ढाल म्हणून वापरत करत आहे आणि हा त्याचा पुरावा आहे.

७ ऑक्टोबरच्या दिवशीचे रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण केले उघड !

इस्रायल सैन्याने या वेळी या रुग्णालयातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण उघड केले आहे. यात ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर हमासने आक्रमण केले, त्या दिवशी सकाळी काही ओलिसांना पकडून या रुग्णालयात आणण्यात आल्याचे यात चित्रीकरण आहे. यावरून या रुग्णालयाच्या बोगद्यामध्ये या ओलिसांना लपवून ठेवण्यात आल्याचे उघड होते.

(म्हणे) ‘बोगदे नागरी पायाभूत सुविधेपैकी एक !’ – हमासचे हास्यास्पद स्पष्टीकरण

या बोगद्याविषयी हमासने स्पष्टीकरण देतांना म्हटले की, संपूर्ण गाझामध्ये शेकडो किलोमीटरचे गुप्त बोगदे, बंकर आदी आहेत. या रुग्णालयातील हा बोगदाही नागरी पायाभूत सुविधांपैकी एक आहे. (लोकांना मूर्ख समजणारा हमास ! – संपादक)