काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

देहली येथील २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ

दीपप्रज्वलन करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, जुना आखाड्याचे श्री दर्शन गिरि महाराज, सनातनचे संत पू. संजीव कुमार आणि कर्नल अशोक किणी (निवृत्त)

नवी देहली – भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा प्रारंभ १८ नोव्हेंबर या दिवशी झाला.

शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांद्वारे कार्यक्रमास आरंभ करण्यात आला. या वेळी उद्घाटनपर भाषणात बोलतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय आहे’, असे म्हटले.

अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले. या अधिवेशनात जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतील धर्माभिमानी सहभागी होत आहेत.