सातारा नगरपालिका अस्‍वच्‍छतेच्‍या विळख्‍यात !

सातारा नगरपालिकेच्‍या मुख्‍य प्रवेशद्वाराजवळ थुंकल्‍याने अस्‍वच्‍छ झालेले कोपरे

सातारा, १४ नोव्‍हेंबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्‍या मुख्‍य प्रवेशद्वाराजवळ तंबाखू, गुटखा खाऊन अनेक जण थुंकतात. यामुळे पालिकेचे प्रवेशद्वार अत्‍यंत घाणेरडे दिसत असून पालिकेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे सातारा नगरपालिका अस्‍वच्‍छतेच्‍या विळख्‍यात अडकली आहे.

सातारा नगरपालिकेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्‍ह्यातील महाबळेश्‍वर, पाचगणी, कराड, सातारा आदी नगरपालिकांनी महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ आणि सुंदर शहर स्‍पर्धांमध्‍ये पारितोषिके मिळवली आहेत; मात्र नगरपालिकेला अस्‍वच्‍छतेचे ग्रहण लागलेे आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्‍वच्‍छता केल्‍यास दंड आकारण्‍यात येतो; मात्र सातारा नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई करण्‍यात येत नाही. (याविषयी संबंधित उत्तरदायींवर दोष निश्‍चिती करून कारवाई का करण्‍यात येत नाही ? – संपादक) सातारा शहर स्‍वच्‍छ ठेवण्‍याचे उत्तरदायित्‍व नगरपालिकेचे असले, तरी नगरपालिका कुणी स्‍वच्‍छ ठेवायची ? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहेे. नगरपालिकेच्‍या मुख्‍य प्रवेशद्वाराजवळच येणार्‍या-जाणार्‍यांनी थुंकून कोपरे रंगवले आहेत. गुटखा खाऊन येणार्‍यांना कुणीही अटकाव करत नसल्‍यामुळे नगरपालिकेतील कुठल्‍याही कोपर्‍यात ते थुंकतात. यामुळे नगरपालिकेतील कर्मचार्‍यांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होत असून नगरपालिका इमारतीच्‍या सौंदर्यालाही बाधा निर्माण होत आहे. याविषयी नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घ्‍यावी, अशी अपेक्षा सातारावासीय व्‍यक्‍त करत आहेत.