पुणे – शेतकर्याच्या जागेची सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच घेणार्या तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे गावात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तलाठी नीलेश गद्रे, आदित्य कुंभारकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. एका शेतकर्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या आजोबांनी बक्षीसपत्राद्वारे ३९ गुंठे भूमी दिली होती. भूमीची सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी शेतकर्याने सोनोरी गावातील तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. गद्रे यांनी तक्रारदाराकडे उतार्यावर नोंद करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गद्रे यांनी लाचेची रक्कम कुंभारकरला देण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कुंभारकरला कह्यात घेतले.