नूतनीकरण न केल्यास महापालिकेची कारवाईची चेतावणी
पुणे – विज्ञापन करण्यासाठी महापालिकेच्या अनुमतीने शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभे केले आहेत. त्यासाठी नियमावलीचे पालन करावे लागते. शहरात १ सहस्र ८२६ अधिकृत होर्डिंग्ज आहेत, तर तेवढीच अनधिकृत होर्डिंग्ज आहेत.
अधिकृत होर्डिंग्जचे प्रतिवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागते. तसेच होर्डिंग्जचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (बांधकाम परीक्षण) करून घ्यावे लागते. चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेने नूतनीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे; मात्र १ सहस्र ८२६ अधिकृत होर्डिंग्जपैकी आतापर्यंत केवळ २४५ होर्डिंग्जच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परवाना आणि आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या साहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन ७ दिवसांत ज्या होर्डिंग्जच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही, त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (विज्ञापनांमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ कमावणारी आस्थापने सर्व नियम धाब्यावर बसवतात, हे लज्जास्पद ! नियमांचे पालन न करणार्या आस्थापनांवर कठोर कारवाई करा ! – संपादक)